‘स्कॅम १९९२’सारखी यशस्वी वेब सीरिज दिल्यानंतर करिश्मा तन्ना या अभिनेत्रीला घेऊन दिग्दर्शक हंसल मेहता एक नवी कोरी वेब सीरिज आपल्यासाठी घेऊन येत आहेत. हंसल यांच्या याच आगामी ‘स्कूप’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये स्टार क्राईम रीपोर्टर जागृती पाठकची कथा दाखविण्यात आली आहे, जिच्या आयुष्यात एका ब्रेकिंग न्यूजमुळे भयानक वादळ येतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्कूपच्या ट्रेलरमध्ये करिश्मा तन्ना क्राइम रीपोर्टर जागृती पाठकची भूमिका साकारत आहे. या वेब सीरिजमधून तिचं खासगी आयुष्य आणि पत्रकारितेच्या विश्वात तिने केलेली मेहनत आणि त्यामुळे मिळणारं प्रमोशन, लोकांची ईर्षा आणि एका फोनवरील मुलाखतीमुळे तिचं एका मोठ्या संकटात सापडणं हे आपल्याला बघायला मिळणार आहे.

आणखी वाचा : ‘JioCinema’चा नवा ‘Premium’ प्लॅन जाहीर, प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या किंमत

या वेब सीरिजमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा जागृती आणि अण्डरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्यात टेलिफोनवरून संभाषण होतं आणि त्या एका फोननंतर जागृतीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. या वेब सीरिजचं हे संपूर्ण कथानक काल्पनिक असलं तरी काही सत्य घटनांवर ही वेब सीरिज बेतलेली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

‘स्कॅम १९९२’नंतर हंसल मेहता यांची ही दुसरी वेब सीरिज आहे जिचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. मृण्मयी लागू वैकुल आणि मिरात त्रिवेदी यांनी या वेब सीरिजची कथा लिहिली आहे. या वेब सीरिजमध्ये करिश्मा तन्नासह मोहम्मद जीशान अय्यूब, हरमन बावेजा, प्रोसेनजीत चटर्जीसारखे नावाजलेले कलाकारही प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.

हंसल मेहता यांचा नुकताच आलेला ‘फराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. याबरोबरच हंसल मेहता सध्या त्यांच्या आगामी ‘तेलगी स्कॅम’वरील वेब सीरिजवरही काम करत आहेत. ‘स्कूप’ ही वेब सीरिज २ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karishma tanna starrer hansal mehtas new webseries scoop trailer avn