कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनचा ‘शेहजादा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. १७ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ३०.६३ कोटी रुपयांची कमाई केली. पण आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. ‘शहजादा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याच्या ५६ दिवसांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
खुद्द कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओ संदेशाद्वारे याची घोषणा केली आहे. शेहजादा अचानक मध्यरात्रीच ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचं सांगितलं जात आहे. कार्तिक आणि क्रीती दोघांनी एक व्हिडिओ शेअर करत या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची घोषणा केली आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “आता काहीही गुप्त ठेवले जाणार नाही.”
आणखी वाचा : बेरोजगार म्हणून हिणवणाऱ्या करण जोहरला कंगनाने दिलेलं सडेतोड उत्तर; म्हणाली “चाचा चौधरी…”
१४ एप्रिलला म्हणजेच कालच ‘शेहजादा’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री प्रदर्शित झाला. आता कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाचा आनंद नेटफ्लिक्सवर घेता येणार आहे. OTT वर हा चित्रपट पाहण्यासाठी तुमच्याकडे नेटफ्लिक्सचे सदस्यत्व असणे आवश्यक आहे. मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही १४९ रुपये भरून एका महिन्याचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता.
डेव्हिड धवनचा मुलगा आणि वरुण धवनचा भाऊ रोहित धवन याने ‘शेहजादा’चे दिग्दर्शन केले होते. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनसह या चित्रपटात रोनित रॉय, परेश रावल, मनीषा कोईराला, राजपाल यादव, सचिन खेडेकर, अंकुर राठी आणि सनी हिंदुजा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्या सुपरहिट चित्रपट ‘आला वैकुंठपुरमलो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.