‘कोटा फॅक्टरी’ सीरिजमध्ये जितू भैय्या साकारणारा जितेंद्र कुमारचं या पात्राशी खऱ्या आयुष्यात साम्य राहिलं आहे. जितेंद्रही जेईईची तयारी करण्यासाठी कोटा इथे राहिला होता आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला. नंतर त्याने इंजिनिअरिंगचं करिअर सोडून फिल्म इंडस्ट्रीची वाट धरली. एका मुलाखतीत जितेंद्रने कोटा आणि आयआयटीमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबद्दल भाष्य केलं आहे.
‘इंडिया टुडे’शी बोलताना जितेंद्र म्हणाला, “बरंच काही बदलण्याची गरज आहे. एक समाज म्हणून आपण आपल्या अनुभवावर चिंतन करून येणाऱ्या पिढीसाठी या गोष्टी आपण सोप्या केल्या पाहिजे, असं मला वाटतं. आपण जे अनुभवलं ते त्यातून आपण शिकायला पाहिजे.”
तो पुढे म्हणाला, “असे काही दिवस असतात जेव्हा तुम्हाला अभ्यास करावा वाटत नाही, क्लासला जावं वाटत नाही आणि ते सामान्य आहे हे आपण ते मान्य करायला पाहिजे. कारण जर तुमचं मनच नसेल तर तो अनुभव घेऊन काय करणार. आम्ही केलं म्हणून त्यांनीही तेच करावं ही मानसिकता योग्य नाही. आपण हे पिढ्यानपिढ्याचं चक्र तोडून त्यांना मोकळं सोडलं पाहिजे, असं केल्यावरच आपण एक मजबूत समाज बनू.”
अभिनेता कोटामध्ये राहिला आहे, तिथं अनेक मुलं आत्महत्या करतात, याचा कधी वैयक्तिक अनुभव आला आहे का? असं विचारल्यावर जितेंद्र म्हणाला, “फक्त कोटामध्येच नाही, तर मी आयआयटी खरगपूरमध्ये या गोष्टी अनुभवल्या आहेत. माझ्या ज्युनियर्सनी अशी धक्कादायक पावलं उचलल्याचं मी पाहिलं आहे. ते सगळं खूप दुःखद आणि त्रासदायक होतं.”
अशीच एक घटना आठवत जितेंद्रने सांगितलं की काही महिन्यांच्या कालावधीत अनेक मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. “त्यापैकी काहींना मी ओळखत होतो. त्यापैकी काहींची कारणं इतकी विचित्र होती की तुम्हाला विश्वास बसणार नाही. मला आठवतं की एक मुलगा आला होता, त्याला आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घ्यायचा होता पण रँक चांगली नव्हती, त्यामुळे त्याला तिथे प्रवेश मिळाला नाही. तो चांगल्या ब्रँचमध्ये असावा अशा अपेक्षा त्याच्याकडून होत्या म्हणून त्याला खरगपूरला येण्यास भाग पाडलं गेलं. पण तिथे आल्यावर पहिल्याच दिवशी त्याने आत्महत्या केली. लोकांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर किती दबाव होता याची कल्पना करा. आणि काय झालं? शेवटी त्या मुलाचा असा दुःखद अंत झाला,” असं जितेंद्र म्हणाला.
या धक्कादायक घटनेनंतर इन्स्टिट्यूशनला तरुणांच्या संरक्षणासाठी पावलं उचलावी लागली, असं जितेंद्रने सांगितलं. “खरगपूरमध्ये करण्यासारखं फार काही नाही, तिथे फिरायला जाण्यासाठी फार ठिकाणं नाहीत, त्यामुळे क्लास संपल्यावर विद्यार्थी अनेकदा संगणकांसमोर बसून राहायचे. या घटनांनंतर अधिकाऱ्यांनी रात्री ८ ते १० या वेळेत वीज घालवल्याचा निर्णय घेतला. सर्व मुलांना आपापल्या खोल्यांमधून बाहेर पडून इतर विद्यार्थ्यांमध्ये मिसळण्यास भाग पाडलं गेलं. त्यांना बाहेर फिरायला जाण्यास सांगण्यात आलं आणि काही महिने हेच रुटीन ठेवलं. मला वाटतं की आपण आता त्या स्तरावर पोहोचलो आहोत जिथे तरुणांचे जीव वाचवण्यासाठी पावलं उचलणं खरंच खूप महत्त्वाचं आहे,” असं जितेंद्र म्हणाला.
© IE Online Media Services (P) Ltd