L2 Empuraan OTT release : दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेला आणि पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित ‘एल-२ एम्पुरान’२७ मार्च २०२५ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. २०१९ च्या ‘लुसिफर’ चित्रपटाचा दुसरा भाग असलेला ‘एल-२ एम्पुरान’ने जगभरात २६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. वादग्रस्त सुरुवातीनंतर आणि ब्लॉकबस्टर कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाल्यानंतरही, मोहनलाल यांचा ‘एल-२ एम्पुरान’ आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरला.
‘एल-२ एम्पुरान’ कधी व कुठे प्रदर्शित होईल?
‘एल-२ एम्पुरान’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्याही पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवल्यानंतर आता लोक घरी बसून ‘एल-२ एम्पुरान’चा आनंद घेऊ शकणार आहेत. स्वत: मोहनलाल यांनी चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘एल-२ एम्पुरान’ येत्या २४ एप्रिलपासून जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) या ओटीटी माध्यमावर पाहता येणार आहे.
‘एल-२ एम्पुरान’ ओटीटीवर पाहण्यास चाहते उत्सुक
मोहनलाल यांच्या ‘एल-२ एम्पुरान’चा घरबसल्या आनंद घेता येणार असल्याचे अनेक प्रेक्षकांनीही याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मोहनलाल यांनी शेअर केलेल्या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “अखेर प्रतीक्षा संपली”, “मी आतुरतेने वाट पाहत आहे”, “घरी बसून पुन्हा या चित्रपटाचा आनंद घेणार” अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.
‘एल-२ एम्पुरान’वरुन झालेला ‘हा’ वाद
२००२ च्या गुजरात दंगलींच्या चित्रपटातील चित्रणावरून वाद निर्माण झाला होता. या विरोधाला तोंड देत, निर्मात्यांनी चित्रपटातील २४ दृश्ये कापली आणि सेन्सॉर केलेली आवृत्ती पुन्हा प्रदर्शित केली. शिवाय मोहनलाल यांनी जाहीर माफीही मागितली. या आव्हानांना तोंड देत ‘एल-२ एम्पुरान’ने स्थानिक आणि जागतिक स्तरावर कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत.
‘एल-२ एम्पुरान’मधील कलाकार
दरम्यान, मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या व्यतिरिक्त ‘एल-२ एम्पुरान’ चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात अमेरिकन लोकांचे कॅमिओदेखील पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात अभिमन्यू सिंह, पृथ्वीराज सुकुमारन, गेम ऑफ थ्रोन्स फेम जेरोम फ्लिन, मंजू वॉरियर, इंद्रजीत सुकुमारन आणि टोविनो थॉमस यांनी मोहनलालच्या ‘एल-२ एम्पुरान’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘एल-२ एम्पुरान’बद्दल थोडक्यात
‘एम्पुरान’ हा २०१९ च्या ‘लूसिफर’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचा सीक्वेल आहे. त्यामध्ये मोहनलाल राजकीय भूमिकेत आहेत; तर पृथ्वीराज सुकुमारन झायेद मसूदची भूमिका साकारत आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन पृथ्वीराज यांनी केले आहे. दोन्ही चित्रपट केरळमधील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहेत. तसेच, जागतिक गुन्हेगारी जगतातल्या सिंडिकेटचे काम यात दाखवण्यात आले आहे.