Chhaava OTT Release Announcement : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार, याबाबत बरीच चर्चा होती. अखेर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख समोर आली आहे. निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ ओटीटीवर कधी रिलीज होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर निर्मात्यांनी हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल याची घोषणा केली आहे. तुम्हीही ‘छावा’ थिएटरमध्ये पाहिला नसेल तर आता लवकरच घरबसल्या पाहता येणार आहे.

ओटीटीवर कधी रिलीज होणार छावा?

‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट दोन महिने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम मोडल्यानंतर आता तो प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. ११ एप्रिलपासून हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध असेल.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार छावा?

‘छावा’ चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स व मॅडॉक फिल्म्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे, ज्यात ‘छावा’च्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती देण्यात आली आहे. “आले राजे आले” असं कॅप्शन देऊन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

‘छावा’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘छावा’ १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन ५५ दिवस झाले आहेत. तरी सिनेमाचे कलेक्शन दिवसेंदिवस वाढतच आहे. या चित्रपटाने भारतात ६०० कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाने देशभरात आतापर्यंत ६०३ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन सात आठवडे झाले आहेत, अजूनही चित्रपट सिनेमागृहांमध्ये चालतोय. या चित्रपटाने जगभरात ८०४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

‘छावा’मधील कलाकार

१३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘छावा’मध्ये हिंदीसह मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. तर, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, आशुतोष राणा, निलकांती पाटेकर, डाएना पेंटी, दिव्या दत्ता, सुव्रत जोशी, सारंग साठ्येसह अनेक कलाकारांनी या चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.