२०२४ या वर्षाला निरोप देताना या वर्षात प्रदर्शित झालेल्या काही अशा चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात, ज्यांचे बजेट कमी होते पण त्यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या यादीत एक-दोन नव्हे तर आठ चित्रपटांची नावे आहेत. या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि समीक्षकांचीदेखील मनं जिंकली. परिणामी या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले राहिले.
मुंज्या
२०२४ मधील कमी बजेटच्या हिट चित्रपटांची चर्चा होते, तेव्हा त्यात पहिले नाव येते ते म्हणजे ‘मुंज्या’. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. IMDB च्या माहितीनुसार, ३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मुंज्या’ने भारतात १२१.४ कोटी आणि जगभरात १२६.२ कोटी रुपयांची कमाई केली. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंह या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
स्त्री 2
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्त्री 2’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक आहे. IMDB वरील माहितीनुसार, त्याचे बजेट १०५ कोटी होते आणि त्याचे जगभरातील कलेक्शन ८५२.४ कोटी होते. भारतात या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आणि तब्बल ७०८.६ कोटींची कमाई केली.
क्रू
करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला विनोदी चित्रपट ‘क्रू’चे बजेट ६० कोटी रुपये होते. IMDB च्या रिपोर्टनुसार, राजेश ए कृष्णन दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या सिनेमाने भारतात ९६.८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर जगभरात १५१.६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
शैतान
काळ्या जादूवर आधारित ‘शैतान’ हा चित्रपट ९५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. यामध्ये अजय देवगण आणि आर माधवन यांसारख्या स्टार्सनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट या वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. IMDB नुसार, त्याने जगभरात २१३.८ कोटी रुपयांचा आणि भारतात १७६.२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
आर्टिकल 370
यामी गौतम आणि प्रियामणी यांच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटाचे बजेट फक्त ४० कोटी रुपये होते. तर या चित्रपटाने जगभरात १०४.८ कोटींचा व्यवसाय केला. भारतात या चित्रपटाने ९२.२ कोटी रुपये कमावले होते. हा या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक आहे.
बॅड न्यूज
तृप्ती डिमरी, विकी कौशल आणि अॅमी विर्क यांच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. त्याचे बजेट ८० कोटी होते. IMDB च्या माहितीनुसार, या चित्रपटाने भारतात ७६.८ कोटी रुपये कमावले होते आणि जगभरात ११३.६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
हेही वाचा – Photos: स्पीडबोटच्या धडकेनंतर बुडाली ‘नीलकमल’ बोट, समुद्रातील धक्कादायक फोटो आले समोर
मडगाव एक्सप्रेस
दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी यांचा ‘मडगाव एक्सप्रेस’ हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. त्याचे बजेट ३५ कोटी रुपये होते, तर चित्रपटाने जगभरात ४६.८ कोटी रुपये आणि भारतात ४३.४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. याचे दिग्दर्शन कुणाल खेमूने केले होते.
श्रीकांत
राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेल्या ‘श्रीकांत’ चित्रपटाचे बजेट ४५ कोटी होते आणि जगभरात या चित्रपटाने ६०.६ कोटींचा व्यवसाय केला होता. भारतात या चित्रपटाने ५७.२ कोटींची कमाई केली होती.