धकधक गर्ल माधुरी दीक्षितने २०२० मध्ये ओटीटी विश्वात पदार्पण केले. तिने नेटफ्लिक्सच्या ‘द फेअर गेम’ या सीरिजमध्ये काम करत नव्या प्रवासाला सुरुवात केली. या सीरिजमध्ये तिच्यासह संजय कपूर, मानव कौल आणि सुहासिनी मुळे अशा कलाकारांनी काम केले आहे. तिच्या या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही आठवड्यांपूर्वी तिचा ‘मजा मा’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नव्वदीचे दशक गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेला तिचा ‘मजा मा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटामध्ये तिने पल्लवी पटेल हे पात्र साकारले आहे. कुटुंबवत्सल पल्लवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि ती समलैगिंक असल्याचे रहस्य सर्वांना कळते. या परिस्थितीवर ती कशी मात करते हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. गजराज राव, ऋत्विक भौमिक, रजित कपूर, शीबा चड्ढा, निनाद कामत आणि बरखा सिंह अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. ‘मजा मा’ या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावर माधुरीने भाष्य केले आहे.
ती म्हणाली, “जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली, तेव्हाचा काळ वेगळा होता. या माध्यमामुळे मला समलैगिंकता या गंभीर विषयावरील चित्रपटामध्ये काम करायचे धाडस करता आले. ओटीटीच्या आगमनामुळे चित्रपटकर्ते बॉक्स ऑफिसच्या बंधनातून मुक्त झाले आहे. यामुळे त्यांना कोणत्याही विषयावर चित्रपट तयार करण्याची मुभा मिळते. करोना काळामध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर जागतिक स्तरावरील कलाकृतींचा आस्वाद घेता आला. परिणामी आपल्याकडे बोल्ड विषयांवर चित्रपट तयार होण्याचे प्रमाण वाढले.”
आणखी वाचा – ‘कांतारा’ बघितल्यानंतर कंगना रणौतने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली “आठवडाभर या चित्रपटाचा…”
२००२ मध्ये माधुरीने ‘देवदास’ या चित्रपटामध्ये काम केले. त्यानंतर तिने काही काळासाठी ब्रेक घेतला. या कालावधीमध्ये ती अमेरिकेमध्ये वास्तव्याला होती. पुढे २००७ मध्ये तिने ‘आजा नच ले’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. सध्या ‘झलक दिखला जा’च्या दहाव्या पर्वामध्ये परिक्षक म्हणून काम करत आहे.