अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या धमाकेदार शोमधून नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हा शो डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. आता या शोचा नवा प्रोमो प्रसारित झाला असून त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. मलायकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवर या शोचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती तिच्या आयुष्यातील मजेदार गोष्टींवर चर्चा करताना दिसत आहे.
मलायका अरोराच्या या शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, “माझ्याबद्दल लोक जे काही बोलतात ते सर्वच तथ्यहीन आहे.” तर दुसरीकडे अभिनेत्री आणि मलायकाची बेस्ट फ्रेंड करीना कपूर खान तिच्याबद्दल बोलताना म्हणते, “ती मजेदार आहे, हॉट आहे, सुंदर आहे. मला वाटतं ती खूपच भारी आणि जबरदस्त आहे. मल्ला तू पुढे जात राहा आणि कधीच हिंमत हारू नकोस कारण हिंमत नसेल तर जगात काहीच मिळत नाही.” असं म्हणत करीनाने मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये मलायका स्वतःबद्दल भरभरून बोलताना दिसत आहे. ज्यात तिने तिचं खासगी आयुष्य, करिअर, यश-अपयश यावर भाष्य केलं आहे. ती म्हणते, “आयुष्यात मी घेतलेला प्रत्येक निर्णय माझ्यासाठी पूर्णपणे फायदेशीर ठरला.” पण हे सर्व बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती रडताना दिसते. त्यावेळी तिची गेस्ट फराह खान तिला सांभाळताना दिसते. फराह म्हणते, “मलायका तू तर रडतानाही खूप सुंदर दिसतेस.”
दरम्यान दिग्दर्शक आणि निर्माती फराह खान मलायकाच्या शोची पहिली पाहुणी असणार आहे. मलायका आणि फराह या खूप चांगल्या मैत्रिणी असल्याने निर्मात्यांनी तिच्याशी पाहुणी म्हणून संपर्क साधला. हा शो ५ डिसेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.