मलायका अरोराचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा शो आता ओटीटीवर प्रसारित झाला आहे. या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर मलायकाचा बॉयफ्रेंज अर्जुन कपूरने तिचं तोंडभरुन कौतुक केलं. इतकंच नव्हे तर “मला तुझा अभिमान आहे” असंही अर्जुनने खास पोस्ट शेअर करत म्हटलं. पण तिचा हा शो प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर मात्र मीम्सचा पाऊस पडत आहे.
‘मूव्हिंग इन विथ मलायका’च्या पहिल्याच भागामध्ये मलायकाने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. अर्जुनशी लग्न करणार की नाही?, पुन्हा आई होणार का? या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं तिने दिली. पण यावरूनच आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.
नेटकऱ्यांनी प्रसिद्धीसाठी हा शो प्रसारित करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी मलायकाच्या खासगी आयुष्याबाबत तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.
एका युजरने तर मीम शेअर करत “ही स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे?” असा प्रश्न विचारला आहे.
तर दुसऱ्या युजरने या शोमध्ये जे बोललं गेलं ते सगळं खोटं असल्याचं म्हटलं आहे. शोच्या पहिल्या भागामध्ये फराह खानने हजेरी लावली होती. मलायकाने ट्रोलिंगबाबत भाष्य केल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.