प्रसिद्ध दिग्दर्शक मणीरत्नम यांची पत्नी सुहासिनी मणीरत्नम या सध्या चर्चेत आहेत. भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बोल्ड कंटेंट तसेच बॉलिवूड स्टार्स यांच्यावर सुहासिनी यांनी टिप्पणी केली आहे. अभिनेत्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीन्स देणं थांबवायला हवं असं मत सुहासिनी यांनी मांडलं आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने सुहासिनी यांच्या या वक्तव्याला सडेतोड उत्तरही दिलं आहे.
‘एबीपी लाईव्ह’च्या एका कार्यक्रमात सुहासिनी यांनी त्यांचं मत मांडलं आहे. यादरम्यान सुहासिनी यांनी त्यांच्या आणि बॉलिवूड अभिनेत्री पुनम पूनम ढिल्लोंमधील संभाषणाचा एक संदर्भ देखील दिला. ओटीटीवर बरेच बडे अभिनेते हे बोल्ड सीन्स करताना पाहून सुहासिनी फारच अस्वस्थ झाल्या होत्या व त्याबाबत त्यांनी पूनम ढिल्लों यांच्याशी याबद्दल चर्चा केली.
आणखी वाचा : ‘डंकी’ पोस्टपोन होणार नाही; डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर आमने सामने येणार किंग खान व प्रभास
या कार्यक्रमात पूनम ढिल्लोंबरोबरच्या त्या संभाषणाची आठवण सांगताना सुहासिनी म्हणाल्या, “आम्ही ओटीटीवरील तो बोल्ड कंटेंट पाहिला. तेव्हा मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की जी गोष्ट एक समाज, सेन्सर किंवा कायदा कधीच मान्य करणार नाही त्या गोष्टी करायला या लोकांमध्ये कुठून धाडस येतं. त्यामुळे मी पूनम ढिल्लोंना फोन लावला अन् तिला विचारलं की मी मुंबईत येऊन या अभिनेत्यांशी संवाद साधून त्यांना हे असे बोल्ड सीन्स न करण्याची विनंती करू का, कारण असं करून ती लोक इतरांची दिशाभूल करत आहेत.”
पूनम ढिल्लों यांची प्रतिक्रिया सांगताना सुहासिनी म्हणाल्या, “मला पुनम म्हणाली, तू आत्ता शांत बस आणि मद्रासमध्येच थांब, इथे येऊ नकोस.” या मुलाखतीमध्ये त्यांनी एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाव न घेता टीका केली. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर खासकरून कोविड काळात भरपूर सॉफ्ट पॉर्न कंटेंट आणि बोल्ड कंटेंट आल्याचं सुहासिनी यांनी नमूद केलं. ही फार गंभीर समस्या आहे असंही सुहासिनी यांनी स्पष्ट केलं.