The Family Man Season 3 : मनोज बाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीजनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या दोन सीजनच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या भागाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे. या सीजनमध्ये अनेक नवीन कलाकारांचे चेहरे दिसणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजचे चित्रीकरण सप्टेंबर २०२४ पासून ईशान्य भारतात नागालँडमध्ये सुरू झाले आहे.
नवीन कलाकार आणि खलनायकांची एंट्री
काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, जयदीप अहलावत या सीजनमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता एका नवीन माहितीनुसार, अभिनेत्री निम्रत कौरलादेखील या सीरिजमध्ये खलनायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली आहे. याचा अर्थ, मनोज बाजपेयीच श्रीकांत तिवारी हे पात्र यावेळी दोन खलनायकांना सामोरे जाणार आहे. मात्र, या खलनायकांच्या भूमिका कशा असणार आहेत, याबाबत फारशी माहिती अजून समोर आलेली नाही. निम्रत कौर ही ‘द लंचबॉक्स’ चित्रपटासाठी आणि ‘होमलँड’ तसेच ‘वेवर्ड पाइन्स’ या अमेरिकन सीरिजमधील भूमिकांमुळे ओळखली जात आहे. तिने अक्षय कुमारबरोबर ‘एयरलिफ्ट’ या चित्रपटातही काम केले आहे.
कुठे सुरू आहे चित्रीकरण?
‘द फॅमिली मॅन ३’चे दिग्दर्शन आणि निर्मिती राज आणि डीके या जोडीने केली आहे. सीरिजचे चित्रीकरण सध्या नागालँडमध्ये सुरू असून, जयदीप अहलावत यांनी चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे. या सीझनची कथा राज, डीके व सुमन कुमार यांनी लिहिली आहे.
पूर्वीचे कलाकार पुन्हा दिसणार
तिसऱ्या सीजनमध्ये काही ओळखीचे कलाकार पुन्हा दिसणार आहेत. त्यामध्ये प्रियामणी (सुचित्रा तिवारी), शारिब हाशमी (जेके तलपडे), आश्लेषा ठाकूर (धृती तिवारी), वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी) यांचा समावेश आहे.
हेही वाचा…ओटीटीवरच्या ‘या’ Turkish सीरिज करतील तुमचं भरभरून मनोरंजन, पाहा यादी
मनोज बाजपेयी पुन्हा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत
‘द फॅमिली मॅन ३’मध्ये मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळीही श्रीकांतला आपले काम आणि कुटुंब या दोन्ही आघाड्यांवर संतुलन साधण्याची धडपड करताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर तो देशाच्या सुरक्षेची काळजी घेत, एक नवा थरार अनुभवेल.
पहिल्या दोन सीरिजचा यशस्वी प्रवास
‘द फॅमिली मॅन’ ही एक अॅक्शन-थ्रिलर वेब सीरिज आहे, जी अॅमेझॉन प्राइमवर प्रसारित झाली होती. पहिल्या सीजनचे चित्रीकरण मुंबई, दिल्ली, केरळ, जम्मू व काश्मीर, तसेच लडाखच्या काही भागांत झाले होते. दुसऱ्या सीजनचे चित्रीकरण नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरू होऊन, सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण झाले होते.