सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात परभणीमध्ये मानवत गावात घडलेल्या हत्याकांडाने उभा देश थरारला होता. या हत्या का झाल्या? कोणी केल्या? कशा पद्धतीने घडवल्या? हा सगळाच नाट्यमय भाग चित्रपटासारख्या कलात्मक माध्यमांना न खुणावता तर नवल होतं. या हत्याकांडावर मराठीत एक चित्रपट आधीच प्रदर्शित झाला आहे. तरीही याच हत्याकांडावर आधारित सोनी लिव्ह या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेली ‘मानवत मर्डर्स’ ही वेबमालिका दोन गोष्टींमुळे वेगळी ठरते. एकतर ही वेबमालिका या घटनेचा तपास करणारे तत्कालीन मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी यांच्या नजरेतून उलगडत जाते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही कथा मालिका ओटीटीवर प्रदर्शित झाल्याने या माध्यमामुळे मिळणारे स्वातंत्र्य आणि वेळ या दोन्हीचा उपयोग करून घेत थरारपटांच्या शैलीत मालिका उलगडली आहे.

‘मानवत मर्डर्स’ ही आठ भागांची वेबमालिका रमाकांत कुलकर्णी यांच्या ‘फुटप्रिंट्स ऑन द सॅण्ड्स ऑफ क्राइम’ या पुस्तकावर बेतलेली आहे. त्यामुळे मानवत हत्याकांड हा या मालिकेचा मुख्य कथाभाग असला तरी रमाकांत कुलकर्णी हे कथानायक आहेत. त्यांच्या नजरेतून ही घटना, त्याचा तपास, सगळं करूनही काही हाती लागत नाही म्हणून पोलिसांमध्ये आलेली हतबलता, अनेक मार्गांनी तपास सुरू ठेवताना हळूहळू मिळत गेलेले धागेदोरे आणि अंतिमत: तपासातून उलगडलेलं या प्रकरणामागचं गूढ अशा नाट्यमय पद्धतीने या हत्याकांडाची कथा दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी प्रेक्षकांसमोर ठेवली आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’ या पहिल्याच दिर्ग्दशकीय प्रयत्नानंतर आशिष यांनी या वेबमालिकेचे दिग्दर्शन केले आहे. वास्तवाच्या जवळ जाणारी चित्रणशैली हे त्यांचं वैशिष्ट्य या वेबमालिकेतूनही जाणवतं. त्याचबरोबर मानवतमधलं हे हत्याकांड १९७२ ते ७४ या दरम्यानचं असल्याने एकूणच त्या काळातील चित्रण दाखवण्यासाठी एका वेगळ्या रंगातून दृश्यमांडणी केली आहे, ज्याचा प्रभाव जाणवतो. मानवतमध्ये एकापाठोपाठ एक आठ हत्या घडल्या.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Satish Wagh Murder Case
Satish Wagh Murder Case : पूर्वीच्या भाडेकरूनेच दिली ५ लाखांची सुपारी; सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

हेही वाचा >>> नाट्यरंग : पाहिले न मी तुला – दृष्टिकोनातील फरकाचा लोच्या

सुरुवातीला या हत्याकांडात लहान मुलींचा बळी घेतला गेला. अचानकपणे गावातील मुली, स्त्रिया गायब होऊ लागल्या. त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह शेतात, बांधावर, वावरात सापडू लागले. आणि भीतीने मानवत गाव थरारून उठले. एकट्यादुकट्याने वावरण्याची सोय उरली नाही. अशा दहशतीच्या वातावरणात रमाकांत कुलकर्णी यांचा मानवत गावात प्रवेश झाला. त्याआधी मानवतमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी काहीच तपास केला नव्हता, अशी स्थिती नव्हती. किंबहुना, या सगळ्या घटनांमागे गावातलेच उत्तमराव बारहाते आणि त्यांची पत्नी रुक्मिणी या प्रतिष्ठित जोडप्याचा हात आहे. आणि या हत्या काळी जादू वा मांत्रिकाच्या नादी लागून केलेल्या आहेत हेही पोलिसांना माहिती झाले होते. मात्र या दोघांना पुराव्यासकट पकडणं आणि त्यांचा नेमका हेतू काय होता हे जाणून घेणं यासाठी रमाकांत कुलकर्णी यांच्यासारख्या अनुभवी तपास अधिकाऱ्याचे प्रयत्न, त्यांनी संयत आणि चिवट स्वभावाने केलेला तपास कामी आला. मानवतमधील त्यावेळच्या वातावरणासह तपासातून उलगडत गेलेला कथाभाग प्रामुख्याने ‘मानवत मर्डर्स’मधून पाहायला मिळतो.

उत्तम पटकथा आणि या हत्याकांडाच्या मुळाशी असणारा अंधश्रद्धेतून आलेला जादूटोण्याचा भाग, प्रत्यक्षात भयंकर पद्धतीने घडलेल्या हत्या लक्षात घेत दिग्दर्शक आशीष बेंडे यांनी पहिल्या दृश्यचौकटीपासून हा थरार प्रेक्षकांना थेट जाणवेल अशी चित्रणशैली स्वीकारली आहे. या घटनाक्रमातील मुख्य संशयित आणि संशयाला जागा निर्माण करतील अशा एकेक व्यक्तिरेखा यांचे जाळे एकीकडे तर दुसरीकडे तपास करणाऱ्या पोलिसांची मानसिकता, स्थानिक पोलीस – मुंबईहून आलेले गुन्हा अन्वेषण शाखेचे अधिकारी, त्यांचे आपापसातील हेवेदावे, तपास करताना श्रेय घेऊन बढती घेण्यासाठीची चढाओढ, काही भ्रष्टाचारी अधिकारी तर काही अत्यंत प्रामाणिक पण कुठल्याही पद्धतीने त्यांच्या हुशारीचा वापरच करून घेतलेला नाही अशा पद्धतीचे शिपाई, त्यांचे परस्परसंबंध याचा खुबीने वापर करत हे कथानक खुलवण्यात आले आहे. रमाकांत कुलकर्णींसारख्या संयत अधिकाऱ्याने अत्यंत धीराने या सगळ्यांना सांभाळून घेत केलेला तपास या गोष्टींमुळे मूळ घटना परिचयाची असली तरी वेबमालिका पाहताना त्यातील उत्कंठाही वाढत जाते आणि रंजकताही टिकून राहते. याचं बरंचसं श्रेय आशीष बेंडे यांच्या दिग्दर्शनाच्या शैलीबरोबरच लेखक गिरीश जोशी यांच्या पटकथेलाही आहे.

कथानकातील थरार वाढवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पार्श्वसंगीताचा केलेला वापरही परिणामकारक ठरला आहे. मात्र, आठ भागांपैकी पहिल्या सहा भागांत हळूहळू होणारा तपास आणि काही व्यक्तिरेखांपुरते मर्यादित असलेले कथानक शेवटच्या दोन भागांत मात्र नको तितक्या वेगाने पळवल्यासारखे वाटते. आत्तापर्यंत पाहिलेल्या व्यक्तिरेखांपैकी एक-दोन वगळता भलतेच चेहरे शेवटच्या दोन भागांपैकी एका भागात आपल्यासमोर येतात. आणि शेवटचा भाग या रहस्यावर पडदा टाकतो. या दोन भागांत झालेली घाई प्रेक्षकांना दमवणारी आहेच मात्र काहीअंशी डोंगर पोखरून हे काय… अशी विचित्र जाणीव देणारी आहे.

आशुतोष गोवारीकर हे रमाकांत कुलकर्णी यांच्या भूमिकेत चपखल बसले आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेतील कलाकार मंडळींनीही अधिक गंमत आणली आहे. सोनाली कुलकर्णी यांनी रुक्मिणीच्या स्वभावछटा, तिचं दु:ख आणि तिच्या नजरेतला कोरडेपणा या सगळ्यांचा मिलाफ अभिनयातून दाखवला आहे. मकरंद अनासपुरे यांना पहिल्यांदाच इतक्या नकारात्मक भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. या सगळ्या गर्दीत सई ताम्हणकरने साकारलेली समिंदरी अधिक लक्ष वेधून घेते. ज्या उद्देशाने मानवतमधील हत्या घडल्या त्यातला फोलपणा लेखक – दिग्दर्शकद्वयीने दाखवला आहे, जो आजही अंधश्रद्धेपायी काहीही करू धजणाऱ्या समाजाच्या मानसिकतेला जोडून घेणारा आहे. त्यादृष्टीने या वेबमालिकेची मांडणी महत्त्वाची वाटते. त्यामुळे उत्तम कलाकारांची साथ घेत साकारलेलं हे मानवत हत्याकांडाचं थरारनाट्य उत्कंठावर्धक आणि रंजक ठरलं आहे.

मानवत मर्डर्स

दिग्दर्शक – आशीष बेंडे कलाकार – आशुतोष गोवारीकर, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, किशोर कदम, मयूर खांडगे, उमेश जगताप, केतन कारंडे, विठ्ठल काळे.

Story img Loader