अभिनेत्री सुश्मिता सेनची बहुप्रतिक्षित ‘ताली’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर ही वेबसीरिज आधारित आहे. सध्या या सीरिजबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे.
सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच चर्चेत असतो. नुकतंच सुबोधने ‘ताली’ या वेबसीरिजच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्याने या सीरिजमध्ये झळकलेल्या कलाकारांच्या अभिनयाबद्दल भाष्य केले आहे. तसेच यातील कथानक आणि लेखन याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : Taali teaser : तृतीयपंथीयांचा संघर्ष उलगडणार, सुश्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या ‘ताली’ वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित
सुबोध भावेची पोस्ट
“श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत ताली ही अप्रतिम वेब मालिका जिओ सिनेमावर पाहिली. बस बाई बस या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. क्षितीज पटवर्धन मित्रा त्यांचे संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस त्याला तोड नाही.खूप खूप कौतुक तुझे.
हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, नंदू माधव, शितल काळे तुम्ही तुमच्या भूमिका किती सुंदर साकारल्या आहेत. कार्तिक निशाणदार, अर्जुन बरन मित्रांनो अशी निर्मिती करायला धाडस लागतं.अप्रतिम.
जिओ सिनेमा मनापासून धन्यवाद ही मालिका सादर केल्याबद्दल. रवी जाधव देवा, तुझ्या प्रत्येक कलाकृती मध्ये तुझा खास असा ठसा असतो.या कलाकृतींमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेलाय. प्रेम
कृतिका देव गणेश- गौरी ही व्यक्तिरेखा उभी रहाण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. सुश्मिता सेन तुम्ही त्या झाला होता.बस इतकेच. श्री गौरी सावंत तुम्हाला मनापासून वंदन”, असे सुबोधने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : तृतीयपंथी विशिष्ट पद्धतीने टाळी का वाजवतात? गौरी सावंत यांनी सांगितले खरे कारण
दरम्यान ‘ताली’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे.