मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. क्रांतीने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडत कलाविश्वात नाव कमावलं. ‘जत्रा’, ‘काकण’, ‘खोखो’, ‘नो एन्ट्री’ अशा अनेक चित्रपटांतून क्रांतीने अभिनयाचा ठसा उमटवला. क्रांती रेनबो हा नवाकोरा मराठी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात उर्मिला कोठारे, सोनाली कुलकर्णी, शरद केळकर आणि ऋषी सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
क्रांती रेडकरने व उर्मिला कोठारेने रेनबो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना क्रांती व उर्मिलाने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिली. या मुलाखतीत क्रांतीला पती समीर वानखेडे यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आले होते. नवाब मलिक यांनीही त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. “समीर वानखेडेंबरोबर तू कायम खंबीरपणे उभी असतेस”, असं विचारलं गेलं.
हेही वाचा>> नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच क्रांती रेडकरचं दोन शब्दांत उत्तर, म्हणाली…
हेही वाचा>> Video: …अन् रडता रडता खाली कोसळली राखी सावंत, नेटकरी म्हणाले “हिला…”
क्रांती उत्तर देत म्हणाली, “जेव्हा तुमचं नाणं खणखणीत असतं, तेव्हाच तुम्ही बोलू शकता. समीर खरंखुरं सोनं आहेत. समीर सत्याच्या बाजूने उभे आहेत. सत्यासाठी लढत आहेत, म्हणून संपूर्ण व्यवस्था त्याच्यावर तुटून पडली आहे. सत्याने वागले म्हणून त्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आताही तो अनेक कायदेशीर लढाया लढत आहे. त्याची बायको असल्याचा अभिमान आहे”.
हेही वाचा>> Video: स्टेजवर गात होता एमसी स्टॅन, गर्दीतून कुणीतरी बाटली फेकली अन्…; कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
क्रांतीने तिला व कुटुंबियांना मिळणाऱ्या धमक्यांबाबतही भाष्य केलं. “अंडरवर्ल्ड आणि वेडे चाहते या दोन गोष्टींपासून सगळ्यात जास्त धोका आहे. ड्रग्जशी अंडरवर्ल्डचा थेट संबंध असल्यामुळे ते सतत अॅक्टिव्ह असतात. ते घर-परिवारही बघत नाहीत. ते तुम्हाला डायरेक्ट संपवतात. दुसरी भीती वेड्या चाहत्यांकडून असते. त्यांना अॅसिड टाकायला किंवा तुमच्या मुलांबरोबर काहीही चुकीचं करण्यासाठी वेळ लागत नाही. ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही उभे आहात, ती मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे हे भय मी रोज जगते आहे. हे तुम्ही बाहेरुन अनुभवू शकत नाही. माझ्या इन्स्टाग्राममध्ये नुसते धमक्यांचे मेसेज आहेत. तुम्हाला जाळून टाकू, तुमच्या कुटुंबाला संपवून टाकू, असे मेसेज मला येतात”, असंही पुढे क्रांती म्हणाली.