मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या सामाजिक असो किंवा राजकीय विषयांवर स्पष्टपणे आपलं मत मांडताना दिसतात. अलीकडच्या मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मराठी ओटीटी सीरिजला अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभलेला नाही. असं मत प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभावरी देशपांडेने मांडलं. ओटीटी माध्यमांविषयी अभिनेत्री नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…
हेही वाचा : भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान विकी कौशलच्या चाहत्यांना मिळणार सरप्राईज, काय ते जाणून घ्या…
विभावरी देशपांडेने ‘चिंटू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘बालगंधर्व’ या चित्रपटांमुळे घराघरांत लोकप्रियता मिळवली. अलीकडेच अल्ट्रा मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने ओटीटी माध्यमांविषयी मत मांडलं तसेच मराठी आणि हिंदी सीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गातील फरक सांगितला. विभावरी म्हणाली, “मराठी प्रेक्षकांना ओटीटी़ माध्यमांमध्ये नेमकं काय बघायचंय याची स्पष्टता अजून आलेली नाही. कारण, मराठी प्रेक्षक हिंदी सीरिजही पाहतात.”
विभावरी पुढे म्हणाली, “सर्वप्रथम मराठी ओटीटी माध्यमांवर प्रेक्षकांना नक्की काय पाहायला आवडेल हे आपल्याला शोधायला लागेल. याचं एक उदाहरण सांगायचं झालं, तर हिंदीमध्ये कतरिना कैफने बिकिनी घातलेली आपण आनंदाने बघतो पण, सई ताम्हणकरने बिकिनी घातली त्यावरून केवढी चर्चा झाली. याची काहीच गरज नव्हती कारण, कलाकार हा कलाकार असतो आणि तो संबंधित भूमिकेला साजेसं काम करत असतो.”
हेही वाचा : ‘अमिताभ’ नावाचं वलय
“मी दिलेल्या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल की, हिंदी आणि मराठी पाहणारा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. त्यामुळे मराठी ओटीटीसाठी आपल्याला नवनवे प्रयोग करावे लागतील. मराठी साहित्याचा आधार घेऊन आपण ओटीटीवर अनेक गोष्टी बनवू शकतो. यामुळे कदाचित आताचा तरूणवर्ग पुन्हा एकदा मराठी साहित्याकडे वळेल. मराठीमध्ये अफाट साहित्य असून त्यावर आधारित ओटीटी कन्टेंट तयार झाला, तर प्रेक्षक त्याला नक्कीच पसंती देतील.” असं विभावरी देशपांडेने सांगितलं.