ऑगस्ट महिना हा जसा बॉलिवूड चित्रपटांसाठी महत्त्वाचा ठरला तसाच तो आपल्या मराठी चित्रपटासाठीही महत्त्वाचा होता. दीगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील सहावे पुष्प म्हणजे ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला.
चित्रपटाला सगळीकडूनच उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मांडणीचं प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केलं. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८.७५ कोटींची कमाई केली होती.
आणखी वाचा : “माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाची ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता मात्र प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. ‘सुभेदार’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. ‘प्राइम व्हिडीओ’ या ओटीती प्लॅटफॉर्मवर ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून २२ सप्टेंबर पासून वेगवेगळ्या देशांमध्ये प्रसारित केला जात आहे.
दरम्यान, ‘सुभेदार’ या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.