Lampan won the Best Series award at the 55th International Film Festival: मराठी ओरिजिनल सीरीज ‘लंपन’ला ५५ व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) बेस्ट वेब सीरिजचा पुरस्कार मिळाला आहे. प्रकाश नारायण संत यांची लोकप्रिय कादंबरी ‘वनवास’वर आधारित या सीरिजमध्ये मिहिर गोडबोलेने लंपन ही भूमिका साकारली आहे. ही सीरिज १६ मे २०२४ रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली होती.
‘लंपन’ ही सीरिज तरूण मुलगा लंपनच्या आत्म-शोधाच्या प्रयत्नांची गोष्ट आहे. यात लंपनच्या ‘आजी’च्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी, त्याच्या आजोबाच्या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी, त्याची जिवलग मैत्रीण सुमीच्या भूमिकेत अवनी भावे आणि त्याच्या वडिलांच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर व त्याच्या आईच्या भूमिकेत कादंबरी कदम आहेत.
पुरस्कार मिळाल्यावर सीरिजचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले,”५५व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला हा पुरस्कार प्रकाश नारायण संत यांच्या कादंबरीच्या कालातीत लोकप्रियतेचा पुरावा आहे. ‘लंपन’मध्ये, आम्ही बालपणातील निष्पाप, साध्या, आनंदी क्षणांचा उत्सव साजरा करायला हवा हे दाखवलं होतं. आपल्या हृदयस्पर्शी कथांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला हे या पुरस्कारातून दिसून येतं. मी हा पुरस्कार सर्व कलाकार, क्रू आणि प्रेक्षकांना समर्पित करतो ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला.”
लंपनच्या आजीची भूमिका करणाऱ्या गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या,”लंपन फक्त एक सीरिज नाही. तर तो प्रेम व आठवणींचा एक प्रवास आहे. या शोचा भाग होणं हा माझ्यासाठी खूप समाधानकारक अनुभव होता. जागतिक स्तरावर दुसऱ्या देशांतील सिनेमा व सीरिजबरोबर हा शो दाखवला जातोय हे पाहून खूप आनंद होतो. आम्हाला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादासाठी आम्ही खूप आभारी आहोत.”
मराठी भाषेत या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. गावाकडचं वातावरण, आजी-आजोबांकडे राहणाऱ्या लंपनला नवीन ठिकाणी रुळायला करावी लागणारी धडपड या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. आजी -आजोबांचं प्रेम, गावाकडचे खेळ असं सगळं या सीरिजमध्ये दाखवलं आहे.