सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने ‘नादानियां’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी इब्राहिम व त्याची को-स्टार खुशी कपूरला ट्रोल केलं जात आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत मराठी कॉमेडियनने इब्राहिमच्या अभिनयाची खिल्ली उडवली आहे.
इब्राहिम अली खान व खुशी कपूर यांचा ‘नादानियां’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कथा व दोघांचा अभिनय या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना आवडलेल्या नाहीत. मराठी स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेने इब्राहिमला ट्रोल केलं आहे. सैफच्या हल्लेखोराला शिक्षा देण्याऐवजी त्याला दोन वेळा ‘नादानियां’ पाहण्याची शिक्षा द्यायला पाहिजे, असं प्रणित मोरे म्हणाला.
सैफ अली खानवर जानेवारी महिन्यात मुंबईतील त्याच्या घरात एका अज्ञात घुसखोराने हल्ला केला होता. घरात चोरीच्या उद्देशाने हा दरोडेखोर शिरला होता. हल्ल्यात जखमी सैफवर लीलावती रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या.
‘नादानियां’मध्ये सैफचा मुलगा इब्राहिमच्या अभिनयाचा उल्लेख करत प्रणित म्हणाला, “त्याने इतका वाईट अभिनय केला आहे की सैफच्या हल्लेखोराला न्यायाधीश म्हणाले, ‘तुला फाशी देणार नाही, पण तुला नादानियां दोन वेळा पाहावा लागेल.’ हे ऐकून हल्लेखोर ओरडतोय, ‘मला मारून टाका’.
प्रणित मोरेने बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूरच्या अभिनयावरही कमेंट केली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान व खुशीच्या ‘लवयापा’चा उल्लेख करत प्रणित मोरे म्हणाला, “खुशी कपूर वेगळ्याच लेव्हलवर आहे. खुशीचा मागील चित्रपट आमिर खानचा मुलगा जुनैद खानबरोबर होता, तिने त्याची प्रतिमा खराब केली. त्यानंतर आता नादानियांमध्ये ती सैफच्या मुलाबरोबर आहे आणि इब्राहिमची प्रतिमा खराब केली. खुशीने ठरवलंय की ‘दिल चाहता है’ मध्ये काम केलेल्या प्रत्येकाच्या मुलांचे करिअर ती बरबाद करेल.”