नेटफ्लिक्सच्या ‘स्ट्रेंजर थिंग्स’ (Stranger things) या सीरिजमुळे अभिनेत्री मिली बॉबी ब्राऊनला खूप प्रसिद्धी मिळाली. २०१६ मध्ये सुरु झालेल्या या सीरिजचे आत्तापर्यंत ४ सीझन प्रदर्शित झाले आहेत. या लोकप्रिय सीरिजमध्ये तिने जेन हॉपर/ एलेव्हन (Jane hopper /eleven) हे महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. तिच्या पात्रामध्ये सायकोकिनेटिक आणि टेलिपॅथिक क्षमता असतात. २०२० मध्ये मिलीचा ‘एनोला होम्स’ (Enola Holmes) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे निर्मात्यांनी याचा सिक्केल तयार करण्याचा निर्णय घेतला.
एनोला होम्स ही सुप्रसिद्ध गुप्तहेर शेरलॉक होम्सची धाकटी बहीण आहे. मोठ्या भावाप्रमाणे तिलाही गुप्तहेर व्हायचे असते. तिच्या सोळाव्या वाढदिवसाच्या दिवशी तिची आई अचानक गायब होते. आईला शोधण्यासाठी ती घराबाहेर पडते आणि तिच्या साहसी प्रवासाची सुरुवात होते असे ‘एनोला होम्स’ या चित्रपटाचे कथानक होते. यामध्ये हेन्री कॅव्हिलने शेरलॉकची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘एनोला होम्स २’ पुढच्या महिन्यामध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा दाक्षिणात्य चित्रपट ‘कांतारा’ लवकरच ओटीटीवर येणार?
ट्रेलरमध्ये एनोलाच्या आईचे पुनरागमन झाल्याचे दिसून येते. या चित्रपटामध्ये ती इंग्लडमध्ये सुरु असलेल्या एका गुंतागुतीच्या प्रकरणावर काम करत एका मुलीला शोधत आहे. अॅक्शन मोडमध्ये असणाऱ्या एनोलाला सांभाळचा प्रयत्न शेरलॉक करत आहे. मिली बॉबी ब्राऊन, हेन्री कॅव्हिल आणि हेलेना बोनहॅम कार्टर यांच्यासह या चित्रपटामध्ये डेव्हिड थेव्लिस या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हेलेना आणि डेव्हिड यांनी हॅरी पॉटरच्या मूव्ही सीरिजमध्ये एकत्र काम केले होते.
नॅन्सी स्प्रिंगर यांच्या ‘द एनोला होम्स मिस्ट्रीज’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे. हॅरी ब्रॅडबीर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.