Mirzapur 3 Release Date: ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिज कधी प्रदर्शित होतेय? हा सर्वात मोठा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक ‘मिर्झापूर ३’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचा अंदाज वर्तवला होता. पण आता ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून ती समोर देखील आली आहे. मात्र सीरिजच्या निर्मात्यांनी चांगलीच युक्ती लढवली आहे. त्यांनी ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख थेट जाहीर न करताना एका फोटोमधून जाहीर करून ती प्रेक्षकांनाच शोधायला सांगितली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘कोटा फॅक्ट्री सीझन ३’ वेब सीरिजची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठी एक खेळ खेळला होता. या खेळातून प्रेक्षकांना अंदाज लावायचा होता की, सीरिज कधी प्रदर्शित होणार आहे. असंच काहीस ‘मिर्झापूर’च्या निर्मात्यांनी केलं आहे. ‘मिर्झापूर ३’ सीरिजची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पण ही तारीख जाणून घेण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे.
‘प्राइम व्हिडीओ’च्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडली आहे. या फोटोच्या वरती लिहिलं आहे, “‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख यात दडली आहे. सापडत असेल तर शोधा.” तसंच हा फोटो शेअर करत ‘प्राइम व्हिडीओ’नं लिहिलं आहे, “आता विचारायचं नाही, शोधायचं. तर आता तयार व्हा.” या फोटोमध्ये सीरिजमधील पात्र दिसत आहेत.
‘प्राइम व्हिडीओ’नं शेअर केलेला फोटो पाहून अनेकांनी ‘मिर्झापूर ३’ सीरिज ७ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज लावला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “७ जुलै. कारण फोटोमध्ये जितक्या गोष्टी आहेत, त्या ७ आहेत. जसे की डिम्मीच्या हाताची बोटं, मुन्नाच्या शर्टची बटणं, बंदूक, पेन्सिल, लोकं, कापरेट इत्यादी सर्वकाही ७ आहेत.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “गाडीच्या नंबर प्लेटवर ७ लिहिलं आहे. ७ बंदूक, ७ लोकं, ७ कारपेट आहे. त्यामुळे प्रदर्शनाची तारीख ७ जुलै आहे.” पण आता नेटकऱ्यांनी लावलेला हा अंदाज कितपत खरा आहे? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
‘मिर्झापूर ३’मध्ये काय पाहायला मिळणार?
‘मिर्झापूर २’ सीरिजच्या शेवटी मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा)ला मारून गुड्डू पंडित (अली फजल) मिर्झापूरच्या खुर्चीवर बसतो आणि कालीन भैय्याला सोडून देतो. आता ‘मिर्झापूर ३’मध्ये कालीन भैय्या आपल्या खुर्ची आणि लेकाच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे. त्यामुळे हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘मिर्झापूर ३’मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल व्यतिरिक्त विवान सिंह, ईशा तलवार, शाहनवाज प्रधान, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, विजय शर्मा असे अनेक कलाकार पुन्हा एकदा जुन्या पात्रांमध्ये झळकणार आहेत.