करोना काळामध्ये लोकांना वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेब सीरिज पाहायची सवय लागली. परिणामी या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कलाकृतींना लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला. या माध्यमाच्या उदयानंतर अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. अॅमेझॅान प्राईम व्हिडिओवरील’मिर्झापूर’ या सीरिजमध्ये मुन्ना भैय्या हे पात्र साकारणारा दिव्येंदु शर्माही या कलाकारांपैकी एक आहे. त्याआधीही त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. पण ओटीटीमुळे त्याला वेगळी ओळख मिळाली.
जानेवारी महिन्यामध्ये दिव्येंदुचा ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याच्यासह अनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये होते. ईंनाम्युल हक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी चित्रपटामध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. फराझ हैदर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यांनी पियूष मिश्रांसह चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.
आणखी वाचा – ऋषभ पंत नव्हे, तर ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता आहे उर्वशी रौतेलाच्या आयुष्यातला खरा ‘RP’? फोटो व्हायरल
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ अशी आपल्याकडे म्हण आहे. माणूस एकदा का एका ध्येयाशी एकनिष्ठ झाला की तो काहीही साध्य करु शकतो असे म्हटले जाते. याच विचारांच्या दोन प्रयत्नशील तरुण इंजिनिअर्सची गोष्ट ‘मेरे देश की धरती’मध्ये दाखवण्यात आली आहे. त्यांच्या येण्याने एका छोट्या गावामध्ये कसे बदल घडत जातात हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. प्रदर्शनाच्या वेळी चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. नुकताच हा चित्रपट अॅमेझॅान प्राईम व्हिडिओवर आला आहे. एका फिल्मी पोर्टलने जाहीर केलेल्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत ‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाचा समावेश केला.
या चित्रपटाची निर्मिती कार्निवल मोशन पिक्चर्स या संस्ठेद्वारे करण्यात आली आहे. या संस्थेच्या सीईओ आणि संचालिका वैशाली सरवणकर यांनी चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच चेअरमन डॉ. श्रीकांत भासी यांनी असेच चांगल्या आशयाचे चित्रपट पुढेही तयार करणार असल्याचे सांगितले आहे.