बदलत्या काळाबरोबरच मनोरंजनाच्या साधनातदेखील बदल होताना दिसत आहेत. फक्त चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याच्या परंपरेला ओटीटी सारख्या माध्यमांनी पर्याय दिला आणि तीन तासांच्या चित्रपटांऐवजी वेबसीरीज हा प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. महत्वाचे म्हणजे ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपट आणि वेबसीरीजला प्रचंड लोकप्रियता मिळाल्याची उदाहरणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘मिर्झापूर’ ही वेब सीरीज आहे.
मिर्झापूर वेब सीरीजच्या पहिल्या दोन भागांना प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर आता या वेबसीरचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांनी या मिर्झापूरच्या तिसऱ्या भागाचे कौतुक केले आहे तर अनेक चाहते नाराज असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आता चित्रपटाचे कथानक, कलाकारांनी निभावलेल्या भूमिका, दिग्दर्शन याबरोबरच आणखी एका गोष्टीबाबत चाहत्यांना उत्सुकता असते ती म्हणजे या कलाकारांना त्यांनी निभावलेल्या भूमिकांसाठी किती पैसे मिळाले. चला तर जाणून घेऊयात ‘मिर्झापूर सीझन ३’ मधील कोणत्या कलाकाराला किती पैसे मिळाले आहेत.
हेही वाचा : Video: तापसी पन्नू व इम्तियाज अली यांची खास मुलाखत, पाहा LIVE
‘देसी ट्रोल्स’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, बिना त्रिपाठी हे पात्र साकारलेल्या रसिका दुग्गल या अभिनेत्रीने प्रति एपिसोड २ लाख रुपए मानधन घेतले आहे. म्हणजेच १० एपिसोडसाठी तिला २० लाख मानधन मिळाले आहे. अली फजल ने ‘गुड्डू पंडित’ या भूमिकेसाठी प्रति एपिसोड १२ लाख रुपए मानधन घेतले आहे म्हणजेच सीरिजसाठी १.२ कोटी एवढं मानधन घेतलं आहे. गोलीच्या भूमिकेत दिसणारी श्वेता त्रिपाठीने प्रति एपिसोड २.२० लाख रुपये घेतले आहेत. म्हणजेच तिने १० एपिसोड्समधून २२ लाख रुपये कमावले आहेत. ‘डीएनए’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पंकज त्रिपाठी यांनी सर्वात जास्त पैसे आकारले आहेत. पहिल्या दोन भागांसाठी अभिनेत्याने १० कोटी रुपये मानधन घेतले होते तर मिर्झापूरच्या तिसऱ्या भागासाठी त्यांनी सर्वात जास्त मानधन आकारल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, या वेबसीरीजने प्रेक्षकांना वेड लावले आहे. दुसऱ्या सीझननंतर या वेबसीरिजचा तिसरा सीझन कधी पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आता ५ जुलै २०२४ ला अमेझॉन प्राइमवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. आता वेब सीरीजमधील कलाकारांच्या अभिनयाचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत. याबरोबरच, रिचा चड्ढाने पती अली फजलच्या दमदार अभिनयाचं कौतुक करत त्याची चाहती असल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ‘मिर्झापूर ३’ मध्ये मुन्ना भैयाचे पात्र दाखवण्यात आलेले नाही. आधीच्या दोन सीझनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मुन्ना भैया नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.