Prajakta Koli Vrishank Khanal Wedding : नेटफ्लिक्सवरील गाजलेली सीरिज ‘मिसमॅच्ड’मधील ‘डिंपल आहुजा’ अर्थात मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता कोळी लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ता तिच्या नेपाळी बॉयफ्रेंडशी लग्न करणार आहे. तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघेही कर्जतमध्ये लग्न करणार आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता कोळी तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालशी लग्न करणार आहे. प्राजक्ता व वृषांक मागील १३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यानी साखरपुडा केला होता. आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपं २५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.
हिंदुस्थान टाइम्सने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “प्राजक्ता आणि वृषांक २५ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. दोघेही याबद्दल खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. मेहंदी, हळदी आणि संगीत नाईटनंतर हे दोघेही लग्न करतील. त्यानंतर रिसेप्शन सोहळा आयोजित केला जाईल. लग्नाचे कार्यक्रम २३ फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि २५ फेब्रुवारीला प्राजक्ता व वृषांकचे लग्न होईल. लग्नाचे सर्व सोहळे कर्जतमध्ये होणार आहेत.”
मूळचा नेपाळचा आहे वृषांक
प्राजक्ता व वृषांकबद्दल बोलायचं झाल्यास प्राजक्ता अभिनेत्री नव्हती, त्याआधीपासून ते एकत्र आहेत. वृषांक हा काठमांडू, नेपाळचा आहे आणि एका मित्राच्या माध्यमातून त्याची प्राजक्ताशी ओळख झाली होती. गणपती पूजेदरम्यान दोघेही एकमेकांना भेटले होते. इथेच वृषांकने प्राजक्ताला डेटसाठी विचारलं होतं, त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि ते प्रेमात पडले. वृषांक हा वकील आहे.
प्राजक्ताचे करिअर
प्राजक्ता ही लोकप्रिय युट्यूबर आहे. मोस्टली सेन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. युट्यूब व्हिडीओ बनवणाऱ्या प्राजक्ताने नंतर अभिनयात नशीब आजमावलं आणि त्यात तिला यश मिळालं. ती ‘मिसमॅच्ड’ या सीरिजसाठी ओळखली जाते. यात तिने डिंपल आहुजा हे पात्र साकारले आहे. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत. या सीरिजमध्ये रोहित सराफ, रणविजय सिन्हा, विद्या माळवदे, तारुक रैना, एहसास चन्ना, मुस्कान जाफरी, अभिनव शर्मा, दिपन्निता शर्मा, लॉरेन रॉबिन्सन, अक्षत सिंह हे कलाकार आहेत. अभिनेत्री असलेली प्राजक्ता आता लेखिकादेखील झाली आहे. नुकतंच तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.