२०२२ साली बॉलिवूड चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. मात्र यावर्षी बॉलिवूडमध्ये एका पेक्षा एक चित्रपटांची चलती असणार आहे. ‘शेरशहा’नंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आता ‘मिशन मजनू’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाची कथा भारताने आखलेल्या एका मोहिमेभोवती फिरते. ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हा गुप्तहेर दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमात घुसखोरी करण्याचे काम त्याच्यावर सोपवले असते. आण्विक क्षमता शोधण्यासाठी तो पाकिस्तानमध्ये प्रवेश करतो. यात त्याचे वेगवेगळे अवतार दिसले आहेत. ट्रेलरमध्ये रश्मिका मंदानाची आणि सिद्धार्थची प्रेमकहाणी पाहायला मिळते. चित्रपटात अॅक्शन-पॅक सिक्वेन्स पाहायला मिळणार हे नक्की. ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
हा चित्रपट १९७१ नंतरच्या भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. जेव्हा पाकिस्तान भारताकडून युद्धात हरले होते. आणि चित्रपटात ते दुसर्या युद्धाची तयारी करत असल्याचे म्हटले आहे. याआधी आलिया भट्टचा ‘राझी’ हा चित्रपटदेखील अशाच कथेवर बेतला होता.
सिद्धार्थच्या बरोबरीने या चित्रपटात परमीत सेठी, शारीब हाश्मी, कुमुद मिश्रा, झाकीर हुसेन आणि मीर सरवर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शंतनू बागची दिग्दर्शित हा चित्रपट २० जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.