Manisha Kayande on Bigg Boss OTT 3 :’बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन सुरू आहे. या शोमध्ये रणवीर शौरी, सना सुल्तान, सना मकबुल, साई केतन राव, विशाल पांडे, मनीषा कुमारी, लवकेश कटारिया, अरमान मलिक (Arman Malik), कृतिका मलिक (Kritika Malik), पायल मलिक, अदनान शेख आणि दीपक चौरसिया यांच्यासह काही स्पर्धक सहभागी झाले आहेत.
अरमान मलिक आपल्या दोन्ही पत्नींबरोबर या शोमध्ये आला होता, पण त्याची पहिली पत्नी पायल सुरुवातीला घराबाहेर पडली. आता अरमान व त्याची दुसरी पत्नी या शोमध्ये आहेत. शोमध्ये या दोघांचा रोमान्स पाहायला मिळत आहे, यावर शिंदे गटाच्या नेत्या व आमदार मनीषा कायंदे यांनी आक्षेप घेत या रिअॅलिटी शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाल्या मनीषा कायंदे?
मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत या शोवर कारवाईची मागणी केली आहे. “बिग बॉस ओटीटी ३ हा एक रिअॅलिटी शो आहे. या शोचे शूटिंग चालू आहे. या शोमध्ये अश्लीलता दाखवण्यात येत आहे. एक युट्यूब एन्फ्लुएन्सर यात सहभागी झाला आहे आणि आता त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. इतंकच नाही तर हे सगळे सीन ऑन एअर दाखवले जात आहेत. त्यामुळे आम्ही मुंबई पोलिसांनी विनंती केली आहे की यावर कारवाई करण्यात यावी. रिअॅलिटी शोच्या नावाखाली हे असभ्य प्रदर्शन कितपत योग्य आहे? याचा तरुणांच्या मनांवर वाईट परिणाम होतो. आम्ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात जाऊन ओटीटी प्लॅटफॉर्म्सबद्दल संसदेच्या चालू अधिवेशनात कायदा करण्याची मागणी करणार आहोत. आम्ही आता त्यांना या कलाकारांना व शोच्या सीईओ यांना अटक करण्याची मागणी केली आहे,” असं मनीषा कायंदे म्हणाल्या.
यावेळी मनीषा कायंदे यांनी महिलांवरील अत्याचाराचा उल्लेख केला. “काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर अँटॉप हिलमध्ये बलात्कार करण्यात आला. तिला माथेरानला नेण्यात आलं होतं. या बलात्काराची पूर्ण घटना शूट करण्यात आली होती. अशा घटना घडत असतील तर कोणीतरी बोलायला हवं,” असंही त्या म्हणाल्या.
मनीषा कायंदे यांनी दावा केला की १८ जुलैला प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या एपिसोडमध्ये अरमान मलिक व कृतिका यांना बेडरूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत दाखवण्यात आलं होतं. या शोमध्ये अरमान व कृतिका यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असंही त्या म्हणाल्या.