कोविडदरम्यान भारतीय प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पुरेपूर फायदा करून घेतला. चित्रपटगृह बंद असल्याने प्रत्येकाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला सुरुवात केली. ओटीटी प्लॅटफॉर्मची खरी ताकद भारतीयांना कोविडदरम्यानच ध्यानात आली. वेगवेगळ्या भाषेतील वेब शोज प्रेक्षकांचे लाडके झाले. ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘मनी हाइस्ट’, ‘नारकोज’, ‘हाऊस ऑफ कार्ड’सारख्या वेब सीरिजची ओळख लोकांना झाली. फक्त इंग्रजीच नव्हे तर कोरियन, जॅपनीज अशा वेगवेगळ्या भाषेतील कंटेंट लोकांच्या पसंतीस पडू लागला.
अशातच सर्वात जास्त चर्चा झाली ती ‘ब्रेकिंग बॅड’ या शोची. अमेरिकन टेलिव्हिजनवर हा शो फार आधीच प्रसारित झाला होता. त्यानंतर नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो उपलब्ध झाल्याने त्याची लोकप्रियता आणखी वाढली. एका केमिस्ट्रिच्या प्रोफेसरला कॅन्सर होतो आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाला कसलीही आर्थिक चणचण भासू नये याखातर तो ड्रग्सच्या व्यवसायात शिरतो अन् तिथून त्याचा सर्वात मोठा ड्रग लॉर्ड बनण्यापर्यंतचा प्रवास या वेब सीरिजमध्ये उलगडला आहे.
आणखी वाचा : किंग खानच्या सर्वात मोठ्या चाहत्याचे निधन; शाहरुखच्या प्रेमाखातर केलेली ‘ही’ गोष्ट
अमेरिकेत तर या सीरिजने वेब विश्वातील सगळे विक्रम मोडीत काढले, आणि नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज आल्यानंतर भारतीय प्रेक्षकांनीदेखील या सीरिजवर भरभरून प्रेम केले. आता भारतीय प्रेक्षकांसाठी याच सीरिजबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. लवकरच ‘ब्रेकिंग बॅड’ हा वेब शो हिंदीतही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘झी कॅफे’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतंच याचा एक प्रोमो झळकला आहे. “प्रतीक्षा संपली आहे! सगळ्या वेब शोजचा बाप ‘ब्रेकिंग बॅड’ पुन्हा येत आहे. आता तुम्ही हा शो केवळ इंग्रजीच नव्हे तर हिंदीतही पाहू शकता.” अशा कॅप्शनसह हा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा शो कधीपासून पाहता येणार आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. लवकरच ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो आपल्याला पाहायला मिळू शकतो.
विन्स गिलीगन हे या वेब सीरिजचे क्रिएटर आहेत. तर ब्रायन क्रॅन्स्टन, आरोन पॉल, बॉब ओडेनकिर्क आणि एना गन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पाच सीझनचा हा वेब शो अमेरिकेत २००८ ते २०१३ या कालावधीत प्रसारित करण्यात आला होता. IMDb वर या शोला ९.५ असं रेटिंग आहे अन् जगभरातील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘ब्रेकिंग बॅड’ ओळखला जातो. आता हा शो हिंदीतही पाहायला मिळणार असल्याने बरेच लोक यासाठी उत्सुक आहेत.