ओटीटी प्लॅटफॉर्म हे पंकज त्रिपाठी, नवाझुद्दीन सिद्दीकीसारख्या कित्येक कलाकारांसाठी वरदान ठरलं आहे. अशाच काही लाजवाब अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे आदिल हुसेन. आदिल हुसेन यांनी बऱ्याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत, पण त्यांना खरी ओळख ओटीटी प्लॅटफॉर्ममुळेच मिळाली. आता पुन्हा आदिल हे ‘झी५’वरील ‘मुखबीर’ या वेबसीरिजमधून लोकांसमोर येणार आहेत.
या सीरिजबद्दल आणि त्यातील भूमिकेबद्दल आदिल हुसेन यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधला. या मुलाखतीमध्ये आदिल यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल आणि एकूणच ओटीटीवर काम करण्याच्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. ‘मुखबीर’मधील आदिल यांचं पात्र खऱ्या इंटेलिजेंस ऑफिसर रामकिशोर नेगी यांच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारं आहे. या भूमिकेबद्दल आदिल म्हणाले, “ही भूमिका माझ्याकडे येण्याआधीच मी या व्यक्तिविषयी माहिती शोधत होतो. अशी कोणती वेबसीरिज बनणार आहे हेदेखील मला ठाऊक नव्हतं, लहानपणापासूनच मला गुप्तहेर कथा प्रचंड आवडतात त्यामुळे या व्यक्तिबद्दल माझ्या मनात भरपूर कुतूहल होतं.”
या मुलाखतीमध्ये या वेबसीरिजबद्दल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दलही आदिल यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणतात, “ही वेबसीरिज म्हणजे माझ्यासाठी एक सुखद धक्काच आहे. बरेच कलाकार स्वतःच्या आतला अभिनेता जीवंत ठेवण्यासाठी नाटकात काम करतात, पण आता हे चित्र बदलत आहे. आता तुम्हाला विविध भाषेतील कलाकृतीत काम करायची संधी ओटीटीमुळे मिळत आहे. ही तर सुरुवात आहे अजून आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही जर एखादी मोठी भूमिका साकारत असाल तर ती तितकीच उत्तमरित्या लिहिणंदेखील गरजेचं आहे. मग त्यात काम करायला मजा येते. ओटीटी हे माध्यम असंच आहे, हे एका टेस्ट क्रिकेट मॅचसारखं आहे आणि चित्रपट म्हणजे टी-२० क्रिकेट मॅचसारखं.”
‘मुखबीर’ या स्पाय थ्रिलर वेबसीरिजमध्ये आदिल खान यांच्याबरोबरच प्रकाश राज, झैन दुरानी यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून ८ भागात ही कथा उलगडणार आहे.