‘टीव्हीएफ’ या वेब कंपनीचा माजी सीइओ अरुणभ कुमार याला २०१७ मध्ये लागलेल्या लैंगिक गैरव्यव्हार संबंधीच्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. मुंबईत कोर्टाने नुकतंच या प्रकरणात अरुणभ दोषी नसल्याचं जाहीर केलं असून यामधून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करताना कारणाशिवाय विलंब झाल्याने न्यायालयाने हा निर्णय जाहीर केल्याचं पीटीआयने स्पष्ट केलं आहे.
वकिलांच्या म्हणण्यानुसार कथित घटना ही २०१४ साली घडली होती आणि त्याची तक्रार तब्बल ३ वर्षांनी दाखल करण्यात आली होती. त्या महिलेने मिडियम.कॉमच्या माध्यमातून अरुणभ यांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता, त्यानंतरच हे प्रकरण जास्त चर्चेत आलं होतं. या पोस्टमध्ये त्या महिलेने ‘द इंडियन उबर – हे टीव्हीएफ आहे’ अशी टिप्पणीही केली होती.
आणखी वाचा : ‘फूल और काँटे’मधला ‘तो’ स्टंट पुन्हा करण्यासाठी अजय देवगण उत्सुक; रिमेकबद्दल अभिनेत्याचा खुलासा
यानंतर टीव्हीएफच्याच एका जुन्या कर्मचारीणीच्या तक्रारीच्या आधारावर अंधेरी पोलिसांनी २०१७ मध्ये अरुणभ यांच्याविरोधातील ही तक्रार दाखल करून घेतली होती. महिलेचा लैंगिक छळ आणि तिचे यौन शोषण केल्याचा आरोप अरुणभ यांच्यावर लावण्यात आला होता. विरोधी पक्षाने एकही सबळ पुरावा सादर न केल्याने ही केस आणखीनच कमकुवत झाली शिवाय तक्रार दाखल करण्यात एवढी वर्षं लागल्याने न्यायालयाने निर्णय अरुणभ यांच्या पक्षात दिला आहे.
२०११ मध्ये अरुणभ यांनी टीव्हीएफची सुरुवात केली. नंतर लागलेल्या आरोपांमुळे त्यांनी २०१७ मध्ये आपल्या सीइओ पदाचा राजीनामा दिला. अरुणभ यांनी टीव्हीएफच्या बऱ्याच कार्यक्रमात अभिनयदेखील केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘पिचर्स’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.