नुकतीच ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ नावाची एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली आहे. चार मुलींची आई असलेल्या एका महिलेच्या निर्घृण हत्याकांडावर आधारित ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज ९० च्या दशकात म्हैसूर राजघराण्याच्या माजी दिवाणाची नात शकीरे खलीली हिच्या हत्येवर आधारित आहे. ३१ वर्षांपूर्वी १९९१ मध्ये घडलेलं हे हत्या प्रकरण प्रचंड गाजलं होतं.
या हत्येप्रकरणी मुरली मनोहर उर्फ स्वामी श्रद्धानंदला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो सध्या मध्य प्रदेशातील मध्यवर्ती कारागृहात आपली शिक्षा भोगत आहे. एका मीडिया रीपोर्टनुसार स्वामी श्रद्धानंदच्या वकिलाने इंडिया टूडे आणि प्राइम व्हिडिओ यांना एक कायदेशीर नोटिस पाठवली आहे. या नोटीसमधून या वेबसीरिजच्या प्रसारणावर बंदी घालायची मागणी करण्यात आली आहे.
आणखी वाचा : ३० एजंट, १० दिवस, एक सीक्रेट मिशन; विद्युत जामवाल, अनुपम खेर यांच्या दमदार ‘IB71’चा ट्रेलर प्रदर्शित
या नोटिसमध्ये लिहिलं आहे की, “सदर वेबसीरिज (डान्सिंग ऑन द ग्रेव्ह) माझ्या क्लायंटशी संबंधित आहे, ज्यांची केस माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. २०१४ च्या रिट याचिका क्र.६६ नुसार तुमची ही वेबसीरिज कायद्याचे उल्लंघन आहे आणि न्यायाधीशांसमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणातील माझ्या आशीलाच्या कायदेशीर अधिकारांवर विपरित परिणाम करत आहे. म्हणून, मी तुम्हाला या कायदेशीर नोटीसद्वारे आवाहन करू इच्छितो की, ही नोटीस मिळाल्यानंतर वर नमूद केलेल्या वेबसीरिजचे प्रसार त्वरित थांबवावे.”
नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, असे त्वरित न केल्यास संबंधीत लोकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याशिवाय मुरली मनोहरच्या वकिलानेह या कायदेशीर कारवाईसाठी ५५ हजार रुपयांची मागणी केली आहे. ही वेबसीरिज २१ एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. सत्य घटनेवर आधारित, या क्राईम सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन पॅट्रिक ग्रॅहम यांनी केले आहे. कनिष्क सिंग देव यांनी या माहितीपटाचे सहलेखन केले.