Nadaaniyan Review: स्टारकिडचं बॉलीवूड पदार्पण म्हणजे नेहमी चर्चेचा विषय असतो. कौटुंबिक पार्श्वभूमी अभिनयाची असल्याने अने सेलिब्रिटींची मुलं याच क्षेत्रात येतात. त्यामुळे नेपोटिझमबद्दलही बरंच बोललं जातं. याच वादादरम्यान आणखी एका स्टारकिडने बॉलीवूडमध्ये एंट्री केली आहे. दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा नातू, अभिनेता सैफ अली खान व अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानचा पहिला चित्रपट ‘नादानियां’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. इब्राहिमचा पदार्पणाचा चित्रपट असल्याने याची जोरदार चर्चा होती, तर हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊया.

‘नादानियां’ हा टिपिकल करण जोहरचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाची सुरुवात अनन्या पांडेच्या ‘कॉल मी Bae’ सीरिजसारखी आहे. सिनेमातील मुख्य पात्र पिया जयसिंग (खुशी कपूर) दिल्लीतील एका बिझनेस कुटुंबातील एकुलती एक लेक आहे. तिची आई नीलू जयसिंग (महिमा चौधरी) व तिचे वडील रजत जयसिंग (सुनील शेट्टी) यांना एक मुलगा हवा होता, पण प्रयत्न करूनही त्यांना दुसरं बाळ होत नाही, त्याची खंत ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त करत असतात. नावाजलेले वकील असलेल्या कुटुंबाचा वारसा पुढे आपण नेऊ शकणार नाही, या दडपणाखाली पिया जगत असते.

पिया दिल्लीतील एका टॉपच्या शाळेत शिकते, तिथे तिचे काही बेस्ट फ्रेंड्स असतात, त्यांना वाटतं की पिया अयान नावाच्या मुलाला डेट करतेय. ते खोटं असल्याचं पिया त्यांना सांगते पण त्यांना विश्वास बसत नाही, त्यामुळे ती खोटं बोलते की तिचा बॉयफ्रेंड आहे. खोटं बोलल्यानंतर बॉयफ्रेंड आणायचा कुठून हा प्रश्न तिला पडतो. तेव्हाच तिच्या शाळेत अर्जुन मेहता (इब्राहिम अली खान) येतो. अर्जुन नोएडात राहतो. अर्जुनचे वडील (जुगल हंसराज) डॉक्टर असतात, तर त्याची आई (दिया मिर्झा) पिया व अर्जुन ज्या शाळेत शिकतात तिथेच शिक्षिका असते. अर्जुन प्रचंड अभ्यासू असतो, त्याचे आयुष्यातील ध्येय ठरलेले असते, त्यामुळे त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात. याचदरम्यान पिया अर्जुनला तिचा फेक बॉयफ्रेंड व्हायची ऑफर देते. एका आठवड्याचे २५ हजार रुपये देऊन अर्जुनला फेक बॉयफ्रेंड म्हणून हायर करते. अर्जुन पैशांसाठी हे नाटक करायला तयार होतो. अर्जुन तिच्या बर्थडे पार्टीत जातो, मात्र तिथे कळतं की अर्जुन हा बिझनेस फॅमिलीतील नसून जयसिंग कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर मेहतांचा मुलगा आहे, त्यानंतर त्याच्याबद्दल जे बोललं जातं त्यामुळे अर्जुन नाराज होतो. पियाचे वडील नंतर अर्जुनला फॅमिली डिनरसाठी बोलवतात, तिथे त्यांना त्यांना अर्जुन आवडतो. पियाच्या आई-वडिलांच्या नात्यात दुरावा असतो, जो अर्जुनमुळे दूर होईल, असं पिया व तिच्या आईला वाटतं. दरम्यान, पियाच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली जाते, त्या पार्टीत पियाच्या घरी जे घडतं, त्यानंतर अर्जुन व पिया यांच्यातील मैत्रीचं नातंही संपतं आणि दुरावा येतो. पुढे काय घडतं, त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.

हेही वाचा – Chhaava Review : नि:शब्द करणारा क्लायमॅक्स, विकी कौशलचा दमदार अभिनय पण, रश्मिका…; ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टीची जाणवली कमी

इब्राहिम व खुशीचा अभिनय कसा आहे?

इब्राहिमचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्या तुलनेने त्याचा अभिनय चांगला आहे. काही ठिकाणी तेच तेच हावभाव पाहायला मिळतात, पण त्याचे प्रयत्न दिसून येतात. स्क्रीनवर इब्राहिमला पाहणं म्हणजे २५ वर्षांपूर्वींच्या सैफलाच पुन्हा बघतोय की काय असं वाटतं. खुशी कपूरबद्दल बोलायचं झाल्यास हा तिचा तिसरा चित्रपट आहे, पण तिला स्क्रीनवर पाहणं म्हणजे सहन करणं वाटतं. तिच्या अभिनयात काहीच वेगळेपण वाटत नाही. डॉयलॉगही खूप मेहनत करून पाठांतर करून बोलल्यासारखं वाटतं. चेहऱ्यावरच्या हावभावात काहीच व्हेरिएशन नाही, त्यामुळे दोन तासांच्या चित्रपटात खुशीला पाहणं हे खरं तर आव्हानच म्हणावं लागेल. खुशीला अजून खूप मेहनत करण्याची गरज आहे. महिमा चौधरी, दिया मिर्झा, सुनील शेट्टी व जुगल हंसराज यांनी त्यांच्या भूमिका चोख वठवल्या आहेत.

हेही वाचा – Chhaava: २२ व्या दिवशीही ‘छावा’चा जलवा कायम! कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, एकूण कलेक्शन जाणून घ्या

दिग्दर्शिका शौना गौतम हिचाही हा पहिलाच चित्रपट आहे. खरंतर चित्रपटात भावनिक व कौटुंबिक गुंतागुंत चांगल्या पद्धतीने दाखवली आहे, पण वेगळ्या विषयावर आधारित हटके चित्रपट आहे, असं काही नाही. शाळेतल्या मुलांच्या लव्ह लाइफवर आधारित चित्रपट असल्याने त्यातील गाणी जरा जास्तच गंभीर आहेत, असं वाटून जातं. चित्रपट पाहताना त्यातील गाणी लक्षात राहत नाही. एकूणच जेन Z साठी हा चित्रपट आहे, त्यामुळे तुम्हाला हलके-फुलके रोमँटिक कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही ‘नादानियां’ पाहू शकता.