गेल्यावर्षी नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ २’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. त्याआधी काही महिन्यांपूर्वी ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही झळकले होते. लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच नागराज सध्या अभिनयातही वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. कायम हटके, वेगळे आणि डोक्याला खाद्य देणारे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक नागराज आहेत. आपल्या चित्रपटातून ते समाजाबद्दल, विषमतेबद्दल भाष्य करत असतात.
‘झुंड’ चित्रपटानंतर नागराज यांना दिग्दर्शक म्हणून पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नागराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट करणार याची चर्चा होती पण मध्यंतरी ‘दी लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागराज यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. या मुलाखतीमध्ये मटका किंग नावाच्या सीरिजसाठी एका स्क्रिप्टवर काम करत असल्याचं नागराज यांनी सांगितलं होतं.
आणखी वाचा : “भूल तो नहीं गये?”, कालीन भैय्याचा सवाल अन् ‘मिर्झापूर ३’ची छोटीशी झलक पाहून चाहते झाले खुश
आता नुकतंच ‘प्राइम व्हिडीओ’ने शेअर केलेल्या त्यांच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये नागराज यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. प्राइम व्हिडीओकडून ‘मटका किंग’ या आगामी वेबसीरिजची घोषणा केली आहे. आधी ही कथा चित्रपटस्वरूपात समोर येणार होती, परंतु आता मात्र ती सीरिजच्या माध्यमातून समोर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सिद्धार्थ रॉय कपूर व नागराज मंजुळे यांनी मिळून या सीरिजची निर्मिती केली असून याचं लेखन व दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘मटका किंग’ या सीरिजमध्ये मुख्य भूमिका प्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विजय वर्मा हा अत्यंत गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘दहाड’ व ‘लस्ट स्टोरीज’सारख्या वेब सीरिजमधील त्याचं काम लोकांनी पसंत केलं. आता त्याला या ‘मटका किंग’मध्ये मुख्य भूमिकेत नागराज मंजुळे कसं दाखवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.