ओटीटी(OTT) माध्यम हे दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. जगभरात विविध भाषांत प्रदर्शित होणारे, वेगवेगळ्या देशांतले सिनेमे, वेब सीरिज या माध्यमांतून प्रेक्षकांना पाहता येतात. त्याबरोबरच चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही पाहायला मिळतात. त्यामुळे कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणता सिनेमा, तसेच कोणती वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता १० मार्च ते १६ मार्चदरम्यान ओटीटीवर काय प्रदर्शित होणार आहे, हे जाणून घेऊ…
बी हॅप्पी (Be Happy)
अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, नोरा फतेही, जॉनी लिव्हर, हरलीन सेठी, इनायत वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वडील व मुलगी यांना देशातील सर्वांत मोठ्या डान्सच्या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा असते, अशा आशयाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळणार आहे.
पोनमन (Ponman)
पोनमन हा मल्याळम सिनेमा आहे. या चित्रपटात अजेश नावाच्या सोन्याच्या व्यापाऱ्याची गोष्ट पाहायला मिळते. हा व्यापारी गावातील लग्नासाठी मौल्यवान वस्तू देतो; पण तो संकटात सापडतो. कारण- एक व्यक्ती व्यापाऱ्याजवळील सोने मिळविण्यासाठी त्याला मारण्याची योजना आखते. या चित्रपटात बेसिल जोसेफ, साजिन गोपू, लिजो मोल जोस, आनंद मनमधन, दीपक परंबोल व किरण पीठांबरन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १४ मार्च रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
ओरू जाती जाथकम (Oru Jaathi Jathakam)
ओरू जाती जातकम (Oru Jaathi Jathakam) हा मल्याळम सिनेमा आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट एका पुरुषाच्या आयुष्याबद्दल आहे. या चित्रपटात कायदू लोहार, इंदू थम्पी, विनीत श्रीनिवासन, मृदुल नायर, निखिला विमल, ईशा तलवार व सायनोरा फिलिप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ओरू जाती जथकम १४ मार्च रोजी मनोरमा मॅक्सवर प्रदर्शित होणार आहे.
दी इलेक्ट्रिक स्टेट (The Electric State)
दी इलेक्ट्रिक हा एक अमेरिकन सिनेमा आहे. एका अनाथ किशोरवयीन मुलीची गोष्ट यामध्ये पाहायला मिळते, जी रहस्यमयी रोबोटसह तिच्या हरवलेल्या भावाला शोधण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटात मिली बॉबी ब्राउन, क्रिस प्रॅट, के हुए क्वान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. दी इलेक्ट्रिक स्टेट १४ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
वनवास (Vanvaas)
नाना पाटेकर व उत्कर्ष शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला वनवास हा चित्रपट १४ मार्च २०२५ ला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनिल शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
दरम्यान, आता या चित्रपटांना ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.