Nawazuddin Siddiqui : ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘कहाणी’ ‘रात अकेली है’, ‘धूमकेतू’, ‘बजरंगी भाईजान’ या आणि अशा अनेक दर्जेदार कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. सीरिज आणि चित्रपटांमधील भूमिकांमुळे त्याने स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नवाजुद्दीनचे अनेक चाहते बऱ्याच दिवसांपासून नव्या चित्रपटाची वाट पाहत होते आणि अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
नवाजुद्दीनचा नवा चित्रपट ‘कोस्टाओ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसंच अनेकांनी नवाजुद्दीनला पुन्हा एकदा नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन एका प्रामाणिक कस्टम अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात नवाजुद्दीन साकारत असलेले पात्र हे स्वतंत्र भारतात होत असलेल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या तस्करीचा तपास करण्याचे दाखवण्यात आलेले आहे. परंतु यादरम्यान एक कट रचला जातो, ज्यामध्ये कोस्टाओ स्वतः अडकतो आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते आणि त्याच्यावर खुनाचा खटला सुरू आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची कथा जबरदस्त असल्याचे जाणवत आहे.
‘कोस्टाओ’च्या भूमिकेत नवाजुद्दीनही अगदी योग्य दिसत आहे. “एका खऱ्या हिरोची, एका कस्टम अधिकाऱ्याची कथा ज्याने संपूर्ण गुन्हेगारी जगताला हादरवून टाकले. ही फक्त एक लढाई नाही.तर त्यागामध्ये कोरलेला हा एक वारसा आहे” असं म्हणत ‘कोस्टाओ’च्या ट्रेलरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली चाहत्यांनी “जुना नवाजुद्दीन परत आला आहे”, “आता मजा येणार”, खूप आतुरतेने वाट पाहत आहोत” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
त्यामुळे कोस्टाओ (नवाजुद्दीन सिद्दीकी) खुनाच्या आरोपातून स्वतःला बाहेर काढू शकतो की नाही? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या चित्रपटात नवाजुद्दीनबरोबरच मराठी अभिनेत्री प्रिया बापटही मुख्य भूमिकेत आहे. शिवाय किशोर कुमारजी, गगन देव रियार आणि हुसेन दलाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १ मे रोजी झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.