नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’ने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप पाडली होती. या शोचा पहिला सीझन २०१७ साली स्ट्रीम झाला होता आणि आत्तापर्यंत या सीरिजचे पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. हा शो आपल्या थरारक कथानकाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो.
जर तुम्हीही अलवारो मोर्टे यांच्या या शोचे चाहते असाल, पण नेटफ्लिक्सवर तेच-तेच पाहून कंटाळला असाल आणि तरीही तुम्हाला ‘मनी हाइस्ट’सारखा थ्रिल अनुभवायचा असेल तर आम्ही तुम्हाला ‘मनी हाइस्ट’सारख्याच पाच दमदार थ्रिलर वेब सीरिजची माहिती करून देणार आहोत. या वेब सीरिज तुम्हाला थरारक अनुभव देतील.
हेही वाचा…या आठवड्यात OTT वर बघा हटके कथांसह जबरदस्त अॅक्शन, कॉमेडी आणि थ्रिलर कंटेन्ट, वाचा यादी
माइंडहंटर (Mindhunter)
‘माइंडहंटर’ ही एक जबरदस्त थ्रिलर वेब सीरिज आहे, याचे आत्तापर्यंत दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. २०१७ साली या सीरिजचा पहिला सीझन स्ट्रीम झाला होता. जोनाथन ग्रोफ़, अन्ना टोर्व आणि इतर कलाकारांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजमध्ये ७० च्या दशकातील कथा मांडली आहे. एफबीआय एजंट गुन्हेगारांच्या मनाशी खेळून कसे त्यांच्या गुप्त योजना उघड करतात, हे या सीरिजमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांना थरारक अनुभव देणारी ही मालिका नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
डार्क (Dark)
‘डार्क’ ही एक जर्मन सायन्स फिक्शन थ्रिलर वेब सीरिज आहे, जी बारान बो ओडर आणि जांटजे फ़्रीज़ यांनी एकत्र तयार केली आहे. २०१७ पासून २०२० पर्यंत या सीरिजचे तीन सीझन आले आहेत. ही सीरिज जर्मनीतील विंडेन नावाच्या काल्पनिक शहरातील रहस्य आणि टाइम ट्रॅव्हलच्या कथांवर आधारित आहे. कुटुंब आणि रहस्यमय जगाचे अनोखे दर्शन घडवणारी ही सीरिज तुम्हाला नक्कीच प्रभावित करेल. ‘डार्क’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
नार्कोज (Narcos)
‘नार्कोज’ ही सीरिज २०१५ साली स्ट्रीम झाली आणि आतापर्यंत याचे तीन सीझन आले आहेत. कोलंबियातील ड्रग्स तस्करांच्या वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित या सीरिजने प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. या सीरिजमध्ये कोलंबियातील ड्रग्स किंगपिन पाब्लो एस्कोबारच्या आयुष्यातील रहस्य उघड होते. हा थरारक शो नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.
अरण्यक (Aranyak)
रवीना टंडन प्रमुख भूमिकेत असलेली ही सीरिज २०२१ साली प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये एका डोंगराळ भागात दोन वेगळ्या दृष्टिकोनाचे पोलिस अधिकारी, एका खुनाच्या प्रकरणाचा तपास करतात. यात तपासादरम्यान राजकीय खेळी, वैयक्तिक हेतू आणि रहस्यमय मिथक उघडकीस येतात. हा अनोखा थरार नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
हेही वाचा…ओटीटीवरच्या ‘या’ Turkish सीरिज करतील तुमचं भरभरून मनोरंजन, पाहा यादी
यू (You)
‘यू’ या थ्रिलर सीरिजचे आत्तापर्यंत चार सीझन प्रदर्शित झाले आहेत, याची सुरुवात २०१८ साली झाली होती. या सीरिजमध्ये प्रत्येक सीनमध्ये तुम्हाला उत्कंठा आणि सस्पेंसचा अनुभव येईल. ही सीरिज पाहताना तुम्हाला क्षणभरही तुमच्या जागेवरून उठायची इच्छा होणार नाही. ही सीरिजदेखील नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
या थरारक सीरिज तुम्हाला ‘मनी हाइस्ट’पेक्षा वेगळा आणि अधिक रोमांचक अनुभव देतील.