The Indrani Mukerjea Story: १२ वर्षांपूर्वी अर्थात २०१२ साली शीना बोरा या २१ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. हाय प्रोफाईल केसमुळे या प्रकरणाची देशभर चर्चा झाली. या प्रकरणात शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षी इंद्राणी मुखर्जीला विषेश सीबीआय कोर्टानं सहा वर्षं तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर सोडलं होतं. यानंतर इंद्राणी सामाजिक जीवनात पुन्हा कार्यरत झाली असून तिनं या सर्व घटनाक्रमावर एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकात शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीनं केला ज्यामुळे पुन्हा या प्रकरणाची चर्चा होऊ लागली.
आता या पुस्तकावर बेतलेली एक डॉक्युमेंटरी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने नुकतंच ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रूथ’ नावाची डॉक्यु-सीरिजची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या गाजलेल्या क्रिमिनल केसेसवर बेतलेल्या बऱ्याच डॉक्यु-सीरिज आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत, आता यात शीना बोरा हत्याकांडाची भर पडली आहे.
आणखी वाचा : हृतिक रोशनच्या ‘फायटर’चं ८० कोटींचे नुकसान; जाणून घ्या नेमकं कारण
या सीरिजच्या माध्यमातून बऱ्याच नव्या गोष्टींची उकल होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. इंद्राणी मुखर्जीच्या ‘अनब्रोकन’ या पुस्तकावर ही सीरिज बेतलेली असणार आहे. शिवाय ही सीरिज इंद्राणी मुखर्जीच्या दृष्टिकोनातून सादर केली जाणार आहे. ‘प्रेस ट्रस्ट इंडिया’च्या वृत्तानुसार इंद्राणी मुखर्जी व तिची मुलं, विधी मुखर्जी, मीखेल बोरा, काही ज्येष्ठ पत्रकार आणि वकील मंडळी या डॉक्यु-सीरिजमध्ये त्यांची त्यांची बाजू मांडणार आहेत.
जवळपास १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली होती. २०१५ मध्ये हे प्रकरण बरंच गाजलं होतं. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणाचा उलगडा केला होता. सीबीआयनं सखोल तपास करून शीना बोराची हत्या झाल्याचं सिद्ध केलं होतं. त्याच गुन्ह्याखाली तिची आई इंद्राणी मुखर्जीला अटकही झाली होती. पण इंद्राणीनंच शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करणारं पत्र पाठवल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाभोवती गूढ निर्माण झालं आहे. हे गूढ अद्याप तसंच आहे अन् आता या नेटफ्लिक्सच्या नव्या सीरिजमधून त्यावर पडदा पडणार की नाही याचं उत्तर मिळू शकतं. २३ फेब्रुवारीपासून ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.