भारतात चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी लोक डोळे झाकून फॉलो करतात. दोन्ही गोष्टींचे चाहते मोठ्या प्रमाणावर या गोष्टींना साजरं करतात. क्रिकेटचे चाहते तर हा खेळ फार आवडीने फॉलो करतात. आधी फक्त कसोटी सामने आणि एकदिवसीय सामने होते, आता त्यात आयपीएल आणि २०-२० सारखे प्रकार आल्याने क्रिकेट हा खेळ आणखीनच रंजक झाला आहे.
याबरोबरच या क्षेत्रात होणाऱ्या अवैध गोष्टींचेसुद्धा प्रमाण वाढले आहे. क्रिकेट विश्वामध्ये सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणजे मॅच फिक्सिंग. बरेच खेळाडू या दुष्टचक्रात अडकले, काही त्यातून बाहेर पडले तर काहींची कारकीर्दच यामुळे संपुष्टात आली. या गोष्टींचा फटका बऱ्याच खेळाडूंना बसला. त्याहीपेक्षा ‘जेंटलमॅन्स गेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळावर डाग लागला.
आणखी वाचा : ‘मन्नत’मध्ये घुसखोरी प्रकरणी मुंबई पोलिसांचा शाहरुख खानला सल्ला; बंगल्याचं होणार सिक्युरिटी ऑडिट
याच मॅच फिक्सिंगबद्दल भाष्य करणारी एक डॉक्युमेंट्री लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ‘कॉट आऊट’ या नव्या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. ९० च्या दशकात देशातील प्रत्येक तरुण क्रिकेटर व्हायचं स्वप्न उराशी बाळगून होता आणि नेमका त्याच काळात क्रिकेटमधील या मॅच फिक्सिंगवरुन पडदा उठला. या नव्या डॉक्युमेंट्रीमध्ये आपल्याला आजवरच्या सर्वात मोठ्या मॅच फिक्सिंग स्कॅन्डलबद्दल माहिती मिळणार असल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे.
आत्तातरी कोणत्याही मोठ्या क्रिकेटपटूचं नाव या ट्रेलरमध्ये घेतलं नसलं तरी या डॉक्युमेंट्रीमधून मॅच फिक्सिंगबद्दल बऱ्याच नव्या गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. सुप्रिया सोबती यांनी या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलं आहे तर मेघा माथुर यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ही डॉक्युमेंट्री १७ मार्चपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लेटफॉर्मवर पाहता येणार आहे.