रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करणाऱ्या या चित्रपटावर वेगवेगळ्या गोष्टींमुळे टीकाही होताना दिसत आहे. चित्रपटात दाखवलेला हिंसाचार, अश्लील दृश्य, काही वादग्रस्त सीन्स आणि स्त्रियांचं एकूण चित्रण यामुळे चित्रपटालाही ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं. चित्रपट प्रदर्शनानंतरही यावर बरीच चर्चा झाली, विरोध झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाची लांबी ही ३ तास २१ मिनिटे असली तरी याआधी त्याची लांबी ३ तास ५० मिनिटे असल्याचे सांगितले जात होते. यानंतर चित्रपटात रणबीर आणि बॉबी देओल यांचा एक कीसिंग सीनदेखील असल्याची चर्चा होती. यामुळेच ‘अ‍ॅनिमल’चं हे अनकट व्हर्जन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल अशी चर्चाही रंगली होती. चित्रपटगृहात जे प्रदर्शित झालं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि नवीन या ओटीटीवरील व्हर्जनमध्ये पाहायला मिळेल अशी शक्यता होती, पण आता याबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा : प्रदर्शनाआधीच ‘डंकी’ने रचला इतिहास; मुंबईत किंग खानच्या चित्रपटाचा लागणार सर्वात लवकरचा शो, वेळ जाणून घ्या

नेटफ्लिक्स हे ओटीटी प्लॅटफॉर्म यापुढे कोणत्याही भारतीय चित्रपटाचे अनकट व्हर्जन प्रदर्शित करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जे सेन्सॉरकडून पास केलं जाईल तोच चित्रपट ओटीटीवरही दाखवला जाईल हा निर्णय नेटफ्लिक्सने घेतला नाही. नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही सरकारी यंत्रणेचा वचक नसल्याने या प्लॅटफॉर्मने भारतात टिकून राहण्यासाठी स्वतःवरच या प्रकारची सेन्सॉरशिप घातली आहे आणि त्यामुळेच ‘अ‍ॅनिमल’चंही अनकट व्हर्जन नेटफ्लिक्सवर पाहायला मिळायची शक्यता धूसर झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासूनच नेटफ्लिक्सने ही गोष्ट राबवायला सुरुवात केली आहे. अनुभव सिन्हा यांच्या ‘भीड’ या चित्रपटातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाच्या क्लिप होत्या ज्यावर सेन्सॉरने कात्री चालवली होती अन् तेच व्हर्जनदेखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलं. दीबाकर बॅनर्जी यांचा ‘फ्रीडम’ हा चित्रपट बनून नेटफ्लिक्सकडे तयार आहे परंतु अद्याप त्यांनी तो प्रदर्शित केलेला नाही. याबरोबरच गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या ‘लिओ’ आणि ‘ओएमजी २’मध्येही सेन्सॉरने बरेच बदल सुचवले अन् प्रदर्शनानंतर ओटीटीवरदेखील त्या चित्रपटांची एडिटेड कॉपीच प्रदर्शित केली गेली.

याचाच अर्थ असा होतो की नेटफ्लिक्सने सेन्सॉरशी थेट वैर न घेता त्यांनी दिलेल्या बदलांसकटच चित्रपट प्रदर्शित करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ओटीटी माध्यमांवर सरकारची बारीक नजर आहे अन् यामुळेच नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जे जे ‘अ‍ॅनिमल’च्या अनकट व्हर्जनची वाट बघत होते त्यांना मात्र जे चित्रपटगृहात पाहायला मिळालं तेच ओटीटीवरही पाहायला मिळणार आहे. फक्त ‘अ‍ॅनिमल’च नव्हे तर पूढील कोणत्याही भारतीय चित्रपटांचे अनकट व्हर्जन नेटफ्लिक्स प्रदर्शित करणार नसल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे. कंपनीने याबाबतीत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी एकूणच आधीच्या काही अनुभवांवरुन असंच चित्र समोर येत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix will not release any uncut or extended versions of upcoming films or animal avn