टेलिव्हिजनवर एके काळी अधिराज्य करणारी सीरियल क्वीन एकता कपूर ही पुन्हा तिच्या ‘अल्ट बालाजी’ या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मध्यंतरी या प्लॅटफॉर्मवरील एका सीरिजमध्ये भारतीय सैन्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्यामुळे त्यावर जोरदार टीका झाली होती. आताही या ओटीटीवरील अशाच एका वेब सीरिजमुळे एकता कपूर पुन्हा चर्चेत आली आहे.
‘अल्ट बालाजी’वरील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूरवर टीका होत आहे. या सीझनचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या पोस्टरमधून देवी लक्ष्मीचा अपमान केल्याचा दावा काही लोकांनी केला आहे. या पोस्टरमध्ये एक स्त्री पाठमोरी उभी दिसत आहे, तिचा साडीचा पदर खाली गेला असून तिच्या कंबरेजवळ कमळाचे फूल दाखवण्यात आले आहे. शिवाय या पोस्टरच्या दोन्ही बाजूला मोराचे चित्रही दिसत आहे.
आणखी वाचा : २००९ मध्ये आलेल्या ‘अवतार’च्या बरोबर २२ वर्षांनंतर येणार त्याचा शेवटचा भाग; सीक्वलबद्दल नवी माहिती आली समोर
हे पोस्टर लक्ष्मीच्या प्रतिमेजवळ जाणारे असल्याने यावर प्रचंड टीका होत आहे. हे पोस्टर पाहून लोकांनी #BanEktaKapoor #BanAltBalaji हे हॅशटॅग वापरत याचा निषेध केला आहे. एका युजरने याबद्दल ट्वीट केलं की, “अल्ट बालाजी हा एकता कपूरचा प्लॅटफॉर्म आहे. यांच्या नावात बालाजी आहे पण कामं फारच वाह्यात आहेत. त्यांच्या या प्लॅटफॉर्मवर संपूर्ण सॉफ्ट पॉर्न कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो. आता तर त्यांनी कहर केला आहे, एका मादक महिलेला कमळावर बसवून त्यांनी हे थम्बनेल तयार केलं आहे. हे फक्त मलाच आपत्तीजनक वाटतंय की तुम्हालाही तसंच वाटतंय?”
हे पोस्टर पाहून लोकांनी त्यांचा विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. “या बॉलीवूड गँगला केवळ आपल्या संस्कृतीचा अपमान करता येतो,” असं एका युजरने ट्वीट करत लिहिलं आहे. प्रेक्षकांच्या फार संतप्त प्रतिक्रिया आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. ‘अल्ट बालाजी’च्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजचा एक मोठा चाहतावर्ग आहे. ग्रामीण भागातील काही आंबटशौकिन कथा या वेब सीरिजमधून मांडल्या जातात.