गेल्या काही वर्षांपासून ओटीटी माध्यमांना चित्रपट आणि मालिकांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक दिग्गज कलाकारांनी ओटीटीवर पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. याउलट काही कलाकारांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेटबाबत आक्षेप नोंदवत या माध्यमावर काम करण्यास स्पष्ट नकार दर्शवला. यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींबरोबर महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीदरम्यानचे फोटो अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
सद्यस्थिती पाहता ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह सीरिजवर बंधने घालण्याची गरज असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले. अनुराग ठाकूर म्हणाले, “ओटीटी माध्यमांना सर्वप्रथम हे कळाले पाहिजे की, त्यांच्या सीरिज प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक पाहतात. त्यामुळे याठिकाणी प्रसारित होणाऱ्या प्रत्येक सीरिजबाबत त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.”
हेही वाचा : “मराठी मनोरंजन सृष्टीत स्टार्स नसले तरीही…”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले “आपल्या कलाकारांना…”
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, “फक्त कंटेटच्या नावाखाली सरकार केव्हाच भारतीय संस्कृती आणि समाजाचा अपमान होऊ देणार नाही. ओटीटी माध्यमांनी त्यांची प्राथमिक जबाबदारी समजून घेऊन समाजात कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घ्यावी. ओटीटीला कल्पकतेचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे, अश्लीलता, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्याचे नाही.”
हेही वाचा : “बायकोचं प्रेम”, लंडनहून परतल्यावर सिद्धार्थ चांदेकरला मितालीने दिलं खास गिफ्ट; अभिनेत्याने शेअर केला फोटो
याशिवाय अनुराग ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’ या नव्या श्रेणीची घोषणा केली आहे. हा पुरस्कार ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणत्याही भारतीय भाषेत प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट वेब सीरिजला देण्यात येईल.