दर आठवड्याला विविध वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटी(OTT)वर प्रदर्शित होत असतात. ओटीटी माध्यमामुळे प्रेक्षकांना विविध पद्धतींपैकी आणि त्यांना हवा तो कंटेट पाहण्याचा आनंद ते घेऊ शकतात. त्याबरोबरच त्यांना पाहिजे त्या वेळेत ओटीटीवर विविध भाषांतील चित्रपट आणि वेब सीरिज पाहता येतात. त्यामुळे ओटीटी माध्यम आता प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. १ एप्रिल ते ६ एप्रिलदरम्यान काही उत्तम चित्रपट, तसेच वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या आठवड्यात कोणते चित्रपट, तसेच वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ते जाणून घेऊयात.

टेस्ट

ही गोष्ट तीन लोकांची आहे, ज्यांची चेन्नईमध्ये एका ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामन्यात भेट होते. त्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागतात, ज्याचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. या चित्रपटात आर. माधवन, नयनतारा, सिद्धार्थ व मीरा जास्मिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषेसह सर्व दाक्षिणात्य भाषा म्हणजेच तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ४ एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

अदृश्यम २

‘अदृश्यम २’मध्ये टॉप सीक्रेट एजंटची कहाणी पाहायला मिळणार आहे. हे एजंट काही धोकादायक घटना घडण्यापूर्वीच ती थांबवण्याचे काम करतात. या वेब सीरिजमध्ये पूजा गौर आणि एजाज खान हे प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. ही वेब सीरिज सोनी लिव्ह या प्लॅटफॉर्मवर ४ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

चमक : द कन्क्लुजन

‘चमक : द कन्क्लुजन’ची ही गोष्ट काला या व्यक्तीवर आधारित आहे, ज्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. तसेच कुटुंबाच्या वारशामागील सत्य उघड करायचे आहे. मनोज पाहवा, गिप्पी ग्रेवाल, परमवीर चीमा, मोहित मलिक, ईशा तलवार यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. ४ एप्रिल २०२५ ला सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

टच मी नॉट

टच मी नॉट ही एका तरुण मुलाची गोष्ट आहे. या मुलाकडे स्पर्शाची अलौकिक शक्ती असते आणि त्या शक्तीचा वापर तो काही गुंतागुंतीच्या केसेस सोडवण्यासाठी करतो. तो एक टीम तयार करतो. या सगळ्यात एक खुनी त्याचा पाठलाग करतो. या शोमध्ये नवदीप, दीक्षित शेट्टी, बबलू पृथ्वीराज, कोमली प्रसाद हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. हा शो ४ एप्रिलपासून जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

आता कोणता चित्रपट, तसेच वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.