दिवाळीपूर्वीच्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी ओटीटीवर रोमँटिक-थ्रिलर, अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर, पौराणिक-गाथा आणि डार्क-फँटसी अशा विविध शैलीतील चित्रपट आणि वेब सीरिजची भरघोस मेजवानी आहे.

हा आठवडा ओटीटीवर मनोरंजनाने भरलेला आहे. रोमँटिक-थ्रिलर, अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर, पौराणिक-गाथा आणि डार्क-फँटसी अशा विविध शैलीतील चित्रपट आणि वेब सीरिजची या आठवड्यात भरघोस मेजवानी आहे. चला तर मग, या आठवड्यात रिलीज होणाऱ्या काही प्रमुख शो आणि चित्रपटांची माहिती घेऊया.

हेही वाचा…या वीकेंडला OTT वर अनुभवा थरार, पाहा नेटफ्लिक्सवरील ‘या’ पाच थ्रिलर वेब सीरिज

‘दो पत्ती’

क्रिती सेनॉन हिच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनलेला ‘दो पत्ती’ या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका आहे. क्रिती यात सौम्य सूद आणि शैली सूद नावाच्या जुळ्या बहिणींची भूमिका साकारताना दिसणार आहे. काजोल या चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जी या जुळ्या बहिणींशी निगडित रहस्यमय प्रकरणात अडकते. रोमँटिक-थ्रिलर असलेल्या या चित्रपटात शाहीर शेख, तन्वी आझमी, बृजेन्द्र काला, विवेक मुशरान आणि प्राची शाह पांड्या हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन कणिका ढिल्लों यांनी केले आहे. ‘दो पत्तियां’ चे दिग्दर्शन शशांक चतुर्वेदी यांनी केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २५ ऑक्टोबरला २०२४ प्रदर्शित झाला आहे.

‘फ्यूरिओसा : अ मॅड मॅक्स सागा’

‘फ्यूरिओसा: अ मॅड मॅक्स सागा’ हा पोस्ट-अपोकॅलिप्टिक अ‍ॅक्शन चित्रपट असून मॅड मॅक्स मालिकेतील पाचवा भाग आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कथा मुख्य पात्र मॅक्स रॉकाटान्स्कीवर केंद्रित नसून मॅड मॅक्स: फ्यूरिओसाचे पूर्व कथानक म्हणून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका अन्या टेलर-जॉय हिने साकारली आहे, तसेच क्रिस हेम्सवर्थ, टॉम बर्क आणि अन्य कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट जॉर्ज मिलर यांनी दिग्दर्शित केला असून निको लाथोरिस यांच्याबरोबर त्यांनी या चित्रपटाचे पटकथा लेखन केले आहे. ‘फ्यूरिओसा’ २३ ऑक्टोबर २०२४ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा…या आठवड्यात OTT वर बघा हटके कथांसह जबरदस्त अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि थ्रिलर कंटेन्ट, वाचा यादी

‘झ्विगाटो’

नंदिता दास दिग्दर्शित ‘झ्विगाटो’ हा चित्रपट एका सर्वसामान्य माणसाच्या संघर्षाची कथा मांडतो. भुवनेश्वर, ओडिशातील मनास सिंग महतो या फॅक्टरी मॅनेजरला नोकरी गमावल्यावर फूड डिलिव्हरी रायडरचे काम करावे लागते. या सोशल-ड्रामा चित्रपटात मनासची भूमिका कपिल शर्मा साकारत आहे, तर त्याची पत्नी प्रतिमाच्या भूमिकेत शाहाना गोस्वामी आहे. चित्रपटात मनासची नोकरी, त्याचे कौटुंबिक जीवन आणि असंख्य आव्हानांना सामोरे जाण्याचे चित्रण केले आहे. ‘झ्विगाटो’ प्राइम व्हिडीओवर २५ ऑक्टोबर २०२४ ला प्रदर्शित झाला आहे.

‘हेलबाउंड सिझन २’

सुपरनॅचरल-ड्रामा प्रकारातील हेलबाउंड या दक्षिण कोरियन मालिकेचा दुसरा सिझन पुन्हा एकदा रहस्यमय जीव आणि मृत्यूच्या धोक्याने भरलेला आहे. लेखक चोई ग्यू-सिओक आणि दिग्दर्शक येओन संग-हो यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या डार्क फँटसी थ्रिलरमध्ये परमेश्वराच्या न्यायावर आधारित धार्मिक गट आणि त्यांच्या अंधविश्वासावर आधारित कथा उलगडते. ‘हेलबाउंड सिझन २’ २५ ऑक्टोबर २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा…Horror Movies on OTT: थरकाप उडविणारे ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, काही सिनेमे उडवतील झोप; पाहा यादी…

‘द लेजेंड ऑफ हनुमान सिझन ५’

‘द लेजेंड ऑफ हनुमान’ हा पौराणिक-एपिक अ‍ॅनिमेशन शो आपल्या पाचव्या सिझनमध्ये लॉर्ड हनुमानाच्या दिव्य प्रवासाचे दर्शन घडवणार आहे. या मालिकेत हनुमानाच्या भक्ती, धैर्य आणि रावणाच्या सैन्याशी चाललेल्या लढाया दाखवण्यात आल्या आहेत. हनुमानाची करुणा, शौर्य, आणि प्रभू श्रीरामावरील त्याची निष्ठा यांचे दृश्यरूप या सिझनमध्ये अनुभवायला मिळणार आहे. ‘द लेजेंड ऑफ हनुमान सिझन ५’ २३ ऑक्टोबर २०२४ रोजी डिस्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.

‘ब्यूटी इन ब्लॅक’

टायलर पेरीनिर्मित ‘ब्यूटी इन ब्लॅक’ ही अमेरिकन ड्रामा सीरिज दोन स्त्रिया आणि त्यांच्या संघर्षपूर्ण जीवनावर आधारित आहे. एका स्त्रीला जगण्यासाठी लढावे लागते तर दुसरी एक यशस्वी कंपनी चालवते. टेलर पॉलिडोर विलियम्स, क्रिस्टल स्टीवर्ट, रिक्को रॉस, डेब्बी मॉर्गन आणि रिचर्ड लॉसन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘ब्यूटी इन ब्लॅक’ २४ ऑक्टोबर २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

हेही वाचा…ओटीटीवरच्या ‘या’ Turkish सीरिज करतील तुमचं भरभरून मनोरंजन, पाहा यादी

या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना मनोरंजन, साहस आणि संघर्षाची अनुभूती देणाऱ्या या शो आणि चित्रपटांना आपल्या बिंज लिस्टमध्ये नक्की स्थान द्या.