विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊस निर्मित ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मध्यंतरी हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती, पण नंतर या चित्रपटाला कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घ्यायला तयार नसल्याचं स्पष्ट झालं.
फिल्म इंडस्ट्री आमच्या विरोधात कट कारस्थान करत आहे, आम्हाला शिक्षा देत आहेत असं सुदीप्तो सेन यांनी वक्तव्य केल्याचंही समोर आलं होतं. आता मात्र या बाबतीत वेगळीच गोष्ट समोर आली आहे. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म विकत न घेण्याला या चित्रपटाचे निर्मातेच कारणीभूत आहेत अशी माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा : लिखाणावरील प्रेमापोटी ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी मोडलेलं स्वतःचं लग्न; नेमकं काय घडलं होतं
चित्रपटसृष्टीशी जोडलेल्या खात्रीशीर सूत्राने ‘इ-टाईम्स’शी बोलताना याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या माहितीनुसार चित्रपटाचे निर्माते याच्या ओटीटी प्रदर्शनासाठी खूप जास्त रक्कम मागत असल्याचं स्पष्ट झालं आहे. चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे ७० ते १०० कोटींची मागणी केली आहे. कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म एवढी मोठी रक्कम देण्यास तयार नसल्याने हा चित्रपट ओटीटीवर येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन वादग्रस्त विधानं करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. अद्याप सुदीप्तो यांनी याबद्दल भाष्य केलेलं नाही. टीझर रिलीज झाल्यापासून ‘द केरला स्टोरी’ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.१५ ते २० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात याची चर्चा होताना दिसत आहे.