वर्षाच्या शेवटी ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांसाठी विविध नव्या आशयाची मेजवानी आहे. त्यात प्रेक्षकांना आवडलेल्या वेब सीरिजचे दुसरे पर्व येत आहेत. प्राईम व्हिडीओवरील ‘बंदिश बँडिट्स’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन आला आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. नव्या वर्षात प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवरील‘पाताल लोक’ या गाजलेल्या सीरिजचा दुसरा सीझन पाहता येणार आहे.
इन्स्टाग्रामवर नवीन पोस्टरद्वारे प्राइम व्हिडीओने ‘पाताल लोक २’ची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टला त्यांनी “या वर्षी गेट्स उघडत आहेत. नवीन सिझन” अशी कॅप्शन दिली आहे. या सिझनचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले आहे, त्यांनी पहिल्या सिझनचेही दिग्दर्शन केले होते.
१७ जानेवारी २०२४ ला ‘पाताल लोक २’ प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. जयदीप अहलावत यांनी यात इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी ही भूमिका साकारली होती. याच भूमिकेत जयदीप अहलावत दुसर्या सिझनमध्ये दिसणार आहे. ‘पाताल लोक २’च्या दुसऱ्या सिझनमध्ये गुल पनाग पुन्हा एकदा जयदीप अहलावत यांच्या हाथीराम चौधरी या पात्राची पत्नी रेनू आणि इश्वाक सिंग सहाय्यक पोलीस इम्रान या भूमिका साकारणार आहेत. या सिझनमध्ये तिलोत्तमा शोम आणि नागेश कुकुनूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला होता. प्रोमोमध्ये हाथीरामला एका रहस्यमय गेटचे रक्षण करताना आणि हल्लेखोरांशी झुंजताना दाखवले होते. प्रोमोच्या एका शॉटमध्ये त्याच्या मानेवर XV.XII.XCVII म्हणजेच (१५ डिसेंबर १९९७) अशी तारीख लिहिलेली होती . यामुळे चाहत्यांमध्ये नवे प्रश्न निर्माण झाले होते.चाहत्यांच्या या प्रश्नांची उत्तरे १७ जानेवारी २०२४ उलगडणार आहेत.
हेही वाचा…‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार
‘पाताल लोक १’ची कथा तरुण तेजपाल यांच्या २०१० मध्ये आलेल्या ‘द स्टोरी ऑफ माय असॅसिन्स’ या कादंबरीवर आधारित आहे. यात जयदीप अहलावत यांनी साकारलेला इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी एका उच्चस्तरीय खटल्याचा तपास करताना दिसतो, ज्यात एका पत्रकाराच्या अपयशी हत्येच्या कटामध्ये चार संशयित सामील असतात. तपासाच्या दरम्यान हातीराम गुन्हेगारी जगतात गुंतत जातो आणि भयावह सत्य उघड करतो. आता ‘पाताल लोक २’ ची कथा काय असेल याबाबतीत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.