Mrinal Kulkarni In Hindi Cinema : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. लवकरच त्यांचा ‘गुलाबी’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मराठी मालिका ‘स्वामी’पासून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘अवंतिका’ मालिकेमुळे मृणाल कुलकर्णी घराघरांत पोहोचल्या. पुढे त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यांनी आपल्या अभिनयाची जादू हिंदीच्या छोट्या पडद्यावरही दाखवली. सोनपरी या मालिकेमध्ये त्यांनी केलेल्या सोनपरीच्या भूमिकेचे आजही अनेक चाहते आहेत. मृणाल कुलकर्णी यांनी हिंदी मालिकांसह हिंदी चित्रपटही केले आहेत. त्या आता मोठ्या कालावधीनंतर हिंदी सिनेमात पुनरागमन करीत आहेत.
मृणाल कुलकर्णी यांच्या नोव्हेंबर महिन्यात दोन मोठ्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्यात एक मराठी आणि एक हिंदी चित्रपट आहे.
हेही वाचा…थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट
h
‘पैठणी’मधून झळकणार मृणाल कुलकर्णी
मृणाल कुलकर्णी ‘पैठण रिश्तों की अतूट डोर’ या नव्याकोऱ्या सिनेमातून हिंदी सिनेविश्वात पुनरागमन करीत आहेत. या चित्रपटात त्या ईशा सिंग या हिंदी मालिकाविश्वातील आघाडीच्या नायिकेबरोबर दिसणार आहेत. ईशा सिंग सध्या ‘बिग बॉस १८’च्या घरात आहेत. तिने बिग बॉस हिंदीच्या घरात आपल्या खेळाने चाहते निर्माण केले आहेत. याआधी ईशाने इश्क का रंग सफेद पिया, कुंडली भाग्य, एक था राजा एक थी राणी अशा टीव्ही मालिकांतून काम केले आहे. तर तिने नुकतेच ‘जब मिला तू’ या टीव्ही मालिकेमध्येही काम केले होते.
मृणाल कुलकर्णी यांचा पैठणी हा सिनेमा १५ नोव्हेंबरपासून ‘झी ५’वर स्ट्रीम होणार आहे. याच सिनेमाचे पोस्टर मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. पोस्टरमध्ये मृणाल कुलकर्णी ग्रे रंगाच्या साडीत दिसत असून, त्यांच्यासमोर पैठणी साडी आणि साडी तयार करण्याचे यंत्र (हातमाग) आहे. तर त्यांच्यामागे उभ्या असलेल्या अभिनेत्री ईशा सिंगच्या हातात हेल्मेट दिसत आहे. पैठणी चित्रपट वारसा आणि मुलीच्या ध्येयाची हृदयस्पर्शी कथा सादर करतो. ‘पैठणी’- जेथे परंपरेला प्रेम मिळते आणि वारशाचा आवाज मिळतो, अशा आशयाची कॅप्शन मृणाल कुलकर्णी यांनी या पोस्टला दिली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी याआधी ‘वीर सावरकर’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व ‘मेड इन चायना’ या हिंदी सिनेमांत त्यांनी याआधी काम केले आहे.
मृणाल कुलकर्णी यांना मातृशोक
मृणाल कुलकर्णी यांच्या आई आणि सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक, तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचे अल्पशा आजाराने २९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्या गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. मृणाल कुलकर्णी यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.