‘पंचायत ३’ आधीच्या दोन सीझनप्रमाणेच ओटीटीवर ट्रेंड करत आहे. प्रेक्षक खूप दिवसांपासून या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत होते. अखेर ही सीरिज २८ मे रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली. सगळीकडे या सीरिजची चर्चा पाहायला मिळत आहे. या सीरिजमधील फुलेरा गाव आणि तिथं घडणारे प्रसंग लोकांना खिळवून ठेवत आहेत. या सीरिजमध्ये नीना गुप्ता प्रधान जी उर्फ मंजू देवीच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज पाहायला जितकी रंजक आहे, तितकंच त्याचं शूटिंग अवघड आहे. शूटिंगदरम्यान दररोज हार मानावीशी वाटायची, कारण ते शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक होतं, असं नीना गुप्ता म्हणाल्या.
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत, नीना गुप्ता यांना ही सीरिज करताना आलेल्या आव्हानांबद्दल विचारण्यात आलं. तसेच एखादा सीन शूट करायला जमणार नाही, अशी भावना मनात कधी आली होती का, असं विचारल्यावर नीना गुप्ता म्हणाल्या की असं त्यांना दररोज वाटायचं. सीरिजच्या एका एपिसोडमध्ये नीना व रघुबीर बाइकवरून पडल्याचा सीन आहे, त्या सीनसाठी खरंच बाइकवरून पडल्याचं नीना यांनी सांगितलं.
IIT मधून शिकलेला जितेंद्र कुमार कसा झाला ‘पंचायत’चा सचिव? फिल्मी आहे त्याची अभिनेता होण्याची गोष्ट
नीना म्हणाल्या, “आम्हाला ४५ ते ४७ अंश सेल्सिअस तापमानात शूटिंग करावं लागलं. एका सीनमध्ये मला दुचाकीवरून खाली पडावं लागलं. रस्त्यावर खड्डे होते आणि लहान दगडही होते, त्यात खूप ऊन व उकाडा होता. कलाकार असो वा टेक्निशिन, सर्वांसाठी आव्हानात्मक होतं. कलाकार किमान फावल्या वेळेत सावलीत उभे राहू शकत होते. पण हे शूट करणं शारीरिकदृष्ट्या खूप कठीण होतं आणि म्हणूनच कदाचित लोकांना शो आवडतोय कारण तो खूप वास्तविक आहे, त्यामुळे लोक त्याच्याशी कनेक्ट होतात. हे शूट करणं खरोखर मजेदार होतं.”
निर्मात्यांबरोबर भांडण अन् ‘पंचायत’ सीरिज सोडण्याबद्दल जितेंद्र कुमार म्हणाला, “एक वेळ अशी आली की…”
या सीरिजसाठी नीना यांनी देवाचे आभार मानले. “माझ्या आयुष्यातील हा रोमांचक टप्पा आहे. मी रोज किमान दोन-तीन वेळा देवाचे आभार मानते की या काळात मला ‘पंचायत’ आणि इतर कामं मिळाली. मी माझ्या आरोग्याची काळजी घेत आहे आणि मला चांगलं काम मिळेल, अशी आशा करतेय, कारण आपलं कामच आपल्याला आयुष्यात पुढे नेतं. काम नसेल तर खूप त्रास होतो, काम असेल तर आयुष्यात आनंद राहतो.”
‘पंचायत’ सीरिजच्या लोकप्रियतेबद्दल नीना गुप्ता म्हणाल्या, “मी आश्चर्यचकित झाले होते. फक्त शहरातील लोकच नाही तर जगभरात या शोला प्रेम मिळतंय. माझा यावर विश्वास बसत नव्हता. लोक माझ्याकडे येतात आणि त्यांना शो किती आवडतो, ते सांगतात. मी नुकतेच सिडनीमध्ये शूटिंग करत होते, एक महिला माझ्याकडे आली आणि म्हणाली की त्यांना पंचायत पाहून भारी वाटतं आणि तिची काकू तिला अगदी माझ्यासारखी वाटते. लोक एखाद्या पात्राशी इतके जोडले जातात, हे पाहून खूप चांगलं वाटतं.”