खुशखुशीत गावराण विनोदाची फोडणी असेलली वेबसीरीज म्हणून ‘पंचायत’ने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पहिल्या भागापासून ही सीरीज लोकांनी उचलून धरली. फुलेरा गावातील ग्रामपंचायत, त्याचा सचिव, सरपंच महिला, तिच्या नावाने कारभार करणारा पती आणि गावातील इरसाल मंडळी यांच्या रोजच्या जीवनातील प्रसंगातून केलेली विनोद निर्मिती हे या सीरीजचे वेगळेपण आहे. आधीच्या दोन्ही सीरीजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर आता सीरीजचा तिसरा भाग २८ मे रोजी प्रदर्शित होत आहे. देशात लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत असताना पंचायतमध्येही निवडणुकीची लगबग सुरू असल्याचं ट्रेलरवरून दिसत आहे. टीव्हीएफनं आज तिसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित केला. त्यातून निवडणुकीच्या माहौलची चुणूक दिसली.
पंचायत सीरीजच्या दुसऱ्या भागाचा शेवट हसवता हसवता थोडा रडवणारा झाला होता. उपसरपंच असलेल्या पांडे नामक पात्राचा एकुलता एक मुलगा सीमेवर शहीद झाल्याचे दाखविण्यात आले होते. या दुःखातही फुलेरा ग्रामस्त आपला अपमान करणाऱ्या आमदाराला तिथून हाकलून लावत स्वाभिमानाने शहीद सुपुत्रावर अंत्यसंस्कार करतात. याचाच धागा पकडत तिसरा भाग सुरू होत आहे. टीव्हीएफने दोन मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित केला असून त्यात तिसऱ्या भागात काय धमाल असणार याची प्रचिती येते.
ग्रामपंचायतीचा सचिव असलेलं अभिषेक त्रिपाठी हे या सीरीजमधील मुख्य पात्र आहे. जितेंद्र कुमार याने आपल्या नैसर्गिक अभिनयाने या पात्राला प्रसिद्ध केलं. याशिवाय महिला सरपंच निना गुप्ता आणि त्यांचे पती रघुबिर यादव यांचा अभिनय, विनोदाची त्यांची उत्तम जाण आणि ग्रामीण बोलीतील संवाद यामुळे तिसऱ्या भागात निवडणुकीची धामधुम चांगलीच रंगलेली दिसत आहे. रघुबीर यादव आपले सरपंच पद टीकवण्याचा तर त्यांचा विरोधक असलेला भूषण (बनराकस) हा त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
भूषण हे पात्र दुर्गेश कुमारने रंगवलं आहे. त्याचा “देख रहा है ना विनोद…” हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. पहिल्या भागात “गजब बेज्जती है यार” या डायलॉगचे असंख्य मिम्स झाले. त्याप्रमाणे “देख रहा है ना विनोद” या वाक्याचेही मिम पाहायला मिळाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हा डायलॉग आणि दुर्गेश कुमारला घेऊन प्रचारासाठी अनेक व्हिडीओ तयार केले होते. हिंदी पट्ट्यात या सीरीजची लोकप्रियता यावरून दिसून येते.
दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा, लेखक चंदन कुमार यांनी फुलेरा गावात निवडणुकीचा रणसंग्राम होणार असल्याची कल्पना दिली आहे. ट्रेलरवरूनही यातील गंमत दिसून येत आहे. प्राइम व्हिडीओनेही ट्रेलरचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.