Panchayat 4 Release Date : ‘पंचायत’ (Panchayat) या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केलं आहे. २०२० साली या सीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गावची पार्श्वभूमी असलेल्या आणि एक नवीन विषय असल्याने या सीरिजला खूप पसंती मिळाली होती. पहिल्या सीझनच्या यशानंतर २०२२ साली दूसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला होता. यालादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यानंतर गेल्या वर्षी या सीरिजचा तिसरा सीझननेही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं.

अशातच आता ‘पंचायत’च्या आगामी म्हणजेच चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. सीरिजला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निर्मात्यांनी सीरिजच्या आगामी चौथ्या सीझनची घोषणा केली आहे. साधी-सरळ पण हृदयस्पर्शी कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय असलेल्या या सीरिजला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निर्मात्यांनी चाहत्यांसाठी चौथ्या सीझनची घोषणा केली आहे.

‘पंचायत’ एक विनोदी सीरिज आहे. अभियांत्रिकी पदवीधर अभिषेक, नोकरीच्या मर्यादित पर्यायांमुळे उत्तर प्रदेशमधील एका दुर्गम गावात पंचायत कार्यालयात सचिव म्हणून नोकरी स्वीकारतो. शहरातून गावात आल्यावर तो स्वतःला कसा त्या राहणीमानात, वातावरणात सामावू घेतो. मग तो तिथला सचिव बनतो. त्यानंतर त्याची मैत्री प्रधान जी, विकास आणि प्रल्हाद यांच्याशी होते आणि कथानक फुलत जाते.

२०२० मध्ये सुरू झालेल्या या आवडत्या सीरिजला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘प्राइम व्हिडीओ’ ‘पंचायत ४’ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. ‘पंचायत ४’ येत्या २ जुलैपासून ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडीओद्वारे ‘पंचायत ४’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘पंचायत ४’च्या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये साहजिकच आनंदाचे वातावरण आहे.

‘पंचायत ३’च्या शेवटी प्रधानजी गोळी लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दिसतात. तर दुसरीकडे सचिवजी, विकास आणि प्रल्हादचा विधायक, भूषणबरोबर जोरदार राडा होतो. शेवटी सर्वजण पोलीस चौकीत खाली बसलेले दिसतात. त्यामुळे आता चौथ्या सीझनमध्ये कथानक कोणतं वळण घेणार?, प्रधानजी या हल्ल्यातून सुखरुप वाचतात का?, सचिवजी व रिंकीचं लग्न होईल का?, हे आगामी सीझनमध्ये दिसणार आहे.

दरम्यान, ‘पंचायत ४’ मध्ये, जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे कलाकार दिसतील. ‘पंचायत ४’ची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी केली आहे. तर चंदन कुमार यांनी कथा लिहिली आहे. तसंच दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी केले आहे.