सप्टेंबरमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या हीट किंवा फ्लॉप ठरण्यावरुन बरीच चर्चा झाली, बरेच मतभेद समोर आले. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. यामुळे अनेकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहिला नाही. पण तरी या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटातील व्हीएफएक्सची चांगलीच खिल्ली उडवली गेली. मात्र रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्रि लोकांना प्रचंड आवडली.
आणखी वाचा : अभिनेत्री उर्फी जावेदचा छोट्या पडद्यावर कमबॅक; सनी लिओनीबरोबर शेअर करणार स्क्रीन
बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला तरी याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. त्यानंतर नुकताच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षक उत्सुक होते. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचेही हटके प्रमोशन करण्यात आले. पण या चित्रपटाला तिथे किती प्रतिसाद मिळेल याचा कोणालाही अंदाज नव्हता. पण आता प्रेक्षक पुन्हा एकदा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करा अशी मागणी करत आहेत.
ओटीटीवर या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद स्पष्ट पाहायला मिळत आहे. ज्या प्रेक्षकांनी या चित्रपटावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला नाही ते प्रेक्षक हा चित्रपट मोठ्या ओटीटीवर बघत आहेत. चित्रपटगृहाप्रमाणेच ओटीटीवरही या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ ‘ब्रह्मास्त्र’ पाहिल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिल्या. हा चित्रपट पाहून आयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाचे, रणबीर-आलिया यांच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. ज्यांनी हा चित्रपट पहिल्यांदा ओटीटीवर पाहिला त्या लोकांना या चित्रपटाचा अनुभव मोठ्या पडद्यावर घ्यायचा असल्याने ते या चित्रपटाला पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची मागणी करू लागले आहेत. तसेच हा उत्कृष्ट चित्रपट असून उगाच या चित्रपटावर बहिष्कार घातला असेही अनेकजण म्हणताना दिसत आहेत. एकंदरीत ‘ब्रह्मास्त्र’ने चित्रपटगृहाप्रमाणेच ओटीटीवरही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.