सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं प्रचंड पेव फुटलेलं आहे, चित्रपटही प्रेक्षक आजकाल ओटीटीवर यायची वाट पाहतात. सगळ्यांच्या सोयीचं बनलेलं हे माध्यम आता मराठी कलाकारांसाठीसुद्धा उत्तम संधी म्हणून समोर आलं आहे. अशाच काही जबरदस्त मराठी कलाकृतींसाठी एक स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजेच ‘प्लॅनेट मराठी’ची जबरदस्त चर्चा आहे. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे मराठी चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात.
नुकतीच या प्लॅटफॉर्मवरील एका नवीन वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. ‘गेमाडपंथी’ असं या आगामी सीरिजचे नाव आहे. नुकताच या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला असून या सीरिजची कथा एक प्रकारची डार्क कॉमेडी असल्याचं स्पष्ट होत आहे.
आणखी वाचा : “सध्या चित्रपटसृष्टी ICU मध्ये…” शाहरुख खानच्या ‘पठाण’चा उल्लेख करत तरण आदर्श यांचं मोठं वक्तव्य
या टीझरमध्ये बरेच बोल्ड सीन्सही आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे याची चर्चा होत आहे. टीझरमध्ये मुख्य अभिनेत्री पूजा कातुर्डे आणि अभिनेता प्रणव रावराणे यांच्यातील बोल्ड केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे एका अपहरणाबद्दल आपल्याला टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या टीझरवरून ही एक प्रकारची बोल्ड कॉमेडी असेल अशी शक्यता आहे. ‘गेमाडपंथी’ या सीरिजचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलेले आहे. याबरोबरच पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, दिगंबर नाईक, सविता मालपेकर असे दिग्गज कलाकार यात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. लवकरच ही सीरिज प्रेक्षकांना ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.