प्लॅनेट मराठी हे ओटीटी विश्वातील पहिलं प्लॅटफॉर्म आहे. २०१७ मध्ये अक्षय बर्दापूरकर यांनी या माध्यमाची स्थापना केली होती. प्लॅनेट मराठीतर्फ आतापर्यंत अनेक दर्जदार कलाकृतीची निर्मिती केली आहे. या प्लॅटफॉर्मवरील अनुराधा, रानबाजार अशा अनेक वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी या निर्मिती संस्थेद्वारे ‘बेबी ऑन बोर्ड’ (Baby on board) या नव्या सीरिजची घोषणा करण्यात आली.
‘बेबी ऑन बोर्ड’ ही सिद्धार्थ आणि श्रुती या विवाहीत जोडप्याची गोष्ट आहे. या सीरिजमध्ये प्रतिक्षा मुगणेकर आणि अभिजीत आमकर हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. सागर केसरकर लिखित आणि दिग्दर्शित या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट झाला. हा ट्रेलर व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष या सीरिजचे निर्माते असून अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘बेबी ऑन बोर्ड’ २८ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा – दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर सिद्धार्थ जाधवने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात श्रुतीच्या गरोदपणाच्या बातमीने होते. जेव्हा एखाद्या जोेडप्याला बाळ होणार असतं. त्यावेळी होणाऱ्या आईबद्दल सर्वजण बोलत असतात, तिची विचारपूस केली जाते. पण बाबांविषयी फारसं बोललं जात नाही. या सीरिजमध्ये नव्याने बाबा होणाऱ्या सिद्धार्थच्या आयुष्यामध्ये बाळाच्या येण्याने होणाऱे बदल दाखवण्यात आले आहेत. हीच ‘बेबी ऑन बोर्ड’ची खासियत आहे. या काळामध्ये श्रुतीला त्रास होऊ नये म्हणून खूपकाही करत असतो. तिच्या डायटपासून ते डॉक्टरांकडे जाण्यापर्यंत तो श्रुतीशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो.
ट्रेलर प्रदर्शनानंतर प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ही हलकीफुलती विनोदी सीरिज प्रेक्षकांना विशेषतः नव्या पिढीतल्या जोडप्यांना जवळची वाटेल. सीरिजमधला हा नऊ महिन्यांचा प्रवास प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी मला आशा आहे. त्यांना प्रत्येकवेळी काहीतरी नवीन हवं असतं आणि त्यांची ही अपेक्षा पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत.”